संघर्ष, जिद्द आणि ‘गावाकडची टेस्ट युट्युब चॅनल ते मसाला ब्रांड : अनिल दादा बंने यांच्या यशाची प्रेरणादायी गोष्ट
जत सांगली : अनिल दादा बंने यांच्या घरी कधी भेट देता येईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. आमचा संपर्क २०१८ पासूनचा. १५ ऑगस्ट २०१८ रोजी मी पहिला 'धारकरी आर्थिक साक्षरता वर्ग' घेतला, तिथेच आमची पहिली तुटकशी ओळख झाली. तसे अनेकजण भेटले आणि निघून गेले; पण अनिल दादांच्या मनात शिकण्याची तीव्र तळमळ आणि काही प्रश्न शिल्लक होते. त्यांनी वेळ मागितली, आणि त्यांच्यासोबत चाकणचे श्री. राज वाडेकर यांनाही मी एकत्रच बोलावले. सुमारे ३०० किलोमीटरचा प्रवास करून अनिल दादा मला भेटायला आले होते. हे अंतर केवळ प्रवासाचे नव्हते, तर "काहीतरी नवीन शिकायचे आणि खरंच पैसे कमवता येतील का?" हे समजून घेण्याच्या जिद्दीचे होते.
सणसवाडी (ता. शिरूर, जि. पुणे) येथील डोंगरावरील श्री नरेश्वर मंदिरामध्ये—जिथे मी अनेक वर्षे वृक्षारोपण व संवर्धन करत आहे—तिथे मी दोघांना भेटलो. लॅपटॉपवरून प्रत्यक्ष माहिती समजावून सांगितली आणि त्यांच्या मनातील सर्व शंका दूर केल्या.
हलाखीचे दिवस आणि सुरुवातीचा संघर्ष
अनिल दादा सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत तालुक्यातील एका ग्रामीण भागातील रहिवासी. घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची. पुण्याला येण्या-जाण्यासाठी खिशात पैसे नसायचे; उसनवारी करून किंवा आईकडून पैसे मागून त्यांनी प्रवासाचा खर्च भागवला. पहिल्या प्रशिक्षणासाठी मित्रासोबत उपाशीपोटी केलेला प्रवास आजही ते विसरलेले नाहीत.
पूर्वी त्यांनी गुरुकुल, गोशाळा, घोडेस्वारी शिकवणे, क्रीडा शिक्षक ते थेट शेतात मोलमजुरी अशी अनेक कामे केली. कोणतीही गोष्ट अंतिम नसते, या विश्वासाने त्यांनी युट्यूब आणि फेसबुकवर काम सुरू केले. सुरुवातीला सतत अपयश आले; पण योग्य मार्गदर्शन, सातत्य आणि व्हॉट्सॲप ग्रुपमधील माहितीच्या आधारे त्यांनी पुन्हा प्रयत्न सुरू ठेवले.
सोशल मीडियाचे जग अनिश्चित असते, हे ओळखून त्यांनी अनेक प्रयोग केले:
- सुरुवातीचे प्रयोग: 'बिजनेस माईंड' चॅनेल सुरू केला, पण अपेक्षित पाठिंबा न मिळाल्याने तो बंद करावा लागला. त्यानंतर राजकारण, पेटीवादन, घोडेस्वारी ते पंढरपूर पालखी असे अनेक विषय हाताळले.
- संचित टीव्ही: या चॅनेलवर यशस्वी शेतकऱ्यांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच कोरोनाचे संकट आले आणि पुन्हा अडचणी निर्माण झाल्या.
'गावाकडची टेस्ट' आणि यशाची नवी दिशा
कोरोना काळात मी त्यांना रेसिपी (खाद्यसंस्कृती) विषयावर काम करण्याचा आग्रह धरला. सुरुवातीला दादा आणि वहिनी दोघेही साशंक होते. जत हा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भाग असल्याने भाषेतील कन्नड-मराठी सरमिसळ, नीटनेटके घर नसणे, अपुरी भांडी आणि मातीची साधी चूल—अशा अनेक अडचणी त्यांच्यासमोर उभ्या होत्या. "आम्हाला नीट मराठी बोलता येईल का?" हा न्यूनगंडही होता.
पण केवळ माझ्या आग्रहाखातर दोघांनी काम सुरू केले. अस्सल ग्रामीण भाषा, गावरान पद्धतीची चूल आणि साधेपणा लोकांना प्रचंड आवडला. लोकांचा हाच प्रतिसाद चॅनेलच्या मोठ्या यशात बदलला. वहिनींनी घेतलेले अफाट कष्ट आणि दादांची पडद्यामागील मेहनत यामुळे 'गावाकडची टेस्ट' हे नाव घराघरांत पोहोचले.
जत येथील प्रत्यक्ष भेट आणि कौटुंबिक कसरत
७ एप्रिल रोजी मी जेव्हा माझ्या पत्नीसह जत येथील त्यांच्या घरी गेलो, तेव्हा तिथली परिस्थिती पाहून आम्ही थक्क झालो.
युट्यूबच्या कमाईतून दादांनी शेतजमीन घेतली खरी, पण तो भाग दुष्काळी असल्याने शेत कसण्यायोग्य करणे आणि विहीर पाडणे हे मोठे आर्थिक आव्हान आहे. गावातील जुन्या घरात उंदीर-घुशींचा त्रास असल्याने ते घर फक्त रेसिपीच्या शूटिंगसाठी वापरले जाते. मसाल्यांचे पॅकिंग, कुरियर करणे आणि शहरातून पार्सल पाठवणे सोपे जावे म्हणून ते सध्या जत शहरात राहतात.
सगळ्यात थक्क करणारी गोष्ट म्हणजे चार लहान मुलांचा सांभाळ करत वहिनी करत असलेली तारेवरची कसरत:
- कोणत्याही नातेवाईकांचा किंवा शेजाऱ्यांचा थेट आधार नसताना संपूर्ण घराचा गाडा हाकणे.
- मुलांचे संगोपन, जेवण, घरकाम आणि त्याचबरोबर मसाले, पापड, कुरडईच्या ऑर्डर्सचे व्हॉट्सॲप मेसेज व कॉल्स सांभाळणे. (या सर्व मसाल्यांचे प्रशिक्षण माझ्या घरी माझ्या आई आणि कुटुंबीयांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी घेतले होते.)
- शहरातून सर्व साहित्य, मुले आणि पसारा घेऊन शेतावरील घरात जाऊन रेसिपीचे शूटिंग पूर्ण करणे.
पुढील वाटचालीसाठी काही महत्त्वाचे मुद्दे
कधी कधी मी दादांना रागावलो, सल्ले दिले, तर कधी टीकाही केली; पण सांगणे सोपे असते आणि प्रत्यक्ष कृती करणे खूप कठीण. त्यांच्या संघर्षाला आणि जिद्दीला सलाम करताना भविष्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे:
- कामाचे योग्य नियोजन व सातत्य : उत्पादनांची मागणी आणि पुरवठा यांचे सुसूत्र नियोजन करणे.
- मूल्यवर्धन : मसाले, लोणची आणि पापड यासोबत स्थानिक पिकांवर आधारित नव्या उत्पादनांची निर्मिती करणे.
- पर्यायी बाजारपेठ: जवळचे राष्ट्रीय महामार्ग, तीर्थक्षेत्रे किंवा पर्यटन स्थळांचा शोध घेऊन थेट विक्री केंद्र सुरू करणे.
- स्थानिक मर्यादांवर मात: दुष्काळी भागातील भौगोलिक मर्यादा ओळखून इतर यशस्वी व्यावसायिक मॉडेल्सचा अभ्यास करणे आणि पुरेसे भांडवल उभे करणे.
वडिलांचे अकाली छत्र हरपल्यानंतरही, आर्थिक ओढाताण आणि लोकांची अनास्था अनुभवल्यानंतरही अनिल दादांच्या चेहऱ्यावरील हास्य कधी लोपले नाही. कोणत्याही परिस्थितीत हसतमुखाने संकटांचा सामना करण्याची त्यांची वृत्ती प्रेरणादायी आहे. स्वतःसोबतच इतर मित्रांची आणि नातेवाईकांची प्रगती व्हावी ही त्यांची भावना कौतुकास्पद आहे.
अमोल कोकाटे, जयराम शेळके, अशोक शेळके, ज्ञानदेव शिंगटे, राजदादा वाडेकर, प्रमोद जाधव, वैभव पाटील, स्वरूप कुलकर्णी, विनोद पाटणकर, विठ्ठल शेळके, सागर निमघरे यांसारख्या अनेक सहकाऱ्यांची साथ या प्रवासात महत्त्वाची ठरली आहे.
दादा आणि वहिनी, तुमची जिद्द आणि कष्ट खरोखरच वंदनीय आहेत. छत्रपती शिवराय-शंभूराजे आणि संभाजी भिडे गुरुजींच्या प्रेरणेने तुमच्या या प्रामाणिक कष्टाला भविष्यात आणखी मोठे यश मिळो, हीच सदिच्छा. दोघांनाही मनःपूर्वक आदरपूर्वक दंडवत!
त्यांनी वेगवेगळ्या भूमिका करून अभिनय अर्थात कला क्षेत्रात पण आपला ठसा उमटवला आहे.

0 Comments
POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH