सत्य घटना - कॅन्सरग्रस्त आजारी नवरा बायकोशी पत्राद्वारे शेवटचा संवाद साधत आहे!
प्रिय बायको,
आता माझी वेळ फार उरलेली नाही, हे मलाही जाणवतं आहे.
श्वासांची संख्या उरते तशी कमी वाटतेय…
डॉक्टरांनीही सांगितलं आहे की आता आणखी काळजी घेण्याची गरज नाही,
कारण काळजी घेण्याइतका माझा वेळ उरलेलाच नाही.
मी आता जात आहे…
हे वाक्य लिहितानाही हात थरथरतोय,
पण मला वाटतं हे तुझ्यासाठी लिहिलंच पाहिजे… शेवटचं पत्र…
तू सध्या झोपली आहेस. तुझ्या चेहऱ्यावर शांत झोप दिसतेय,
कदाचित दिवसाचा थकवा असेल,
किंवा काळजीचं ओझं…
माझ्या आजारात तू ज्या प्रकारे दिवस-रात्र एक केलीस,
दवाखान्यात, घरात औषधांच्या
माझ्या प्रत्येक वेदनेला स्वतःवर घेतलंस…
त्याचं ऋण मी कधीच फेडू शकणार नाही.
तुझं स्वतःचं आरोग्य मागे पडलं,
तू स्वतःसाठी काहीच मागितलं नाहीस,
फक्त माझा थोडा वेळ वाढावा आणि मी आणखी खूप खूप जगावं एवढंच मागत होतीस.
पण आता मला जाणवतंय…
माझं हे शरीर आता थांबायला तयार आहे…
आणि मला हेही माहीत आहे की,
माझ्या गेल्यानंतर सगळ्या जबाबदाऱ्या तुझ्या खांद्यावर येणार आहेत.
आपली मुलं अजून लहान आहेत,
त्यांना माझं नसणं तू कसं सांगशील, हे मलाही कळत नाही…
पण मला खात्री आहे –
तू त्यांना केवळ आईच नाही, तर माझाही स्पर्श, माझं भान, माझी सावली आणि एका बापाच प्रेम देऊ शकशील.
माझ्या नशिबात तुझ्यासारख्या सुंदर, प्रेमळ आणि जबाबदार बायकोची इथपर्यंत साथ होती,
तेवढं भाग्य पुरेसं वाटतं आहे आता…
मी जातोय…
पण माझ्या आठवणींना साठवून ठेव,
माझ्या हसण्याचा आवाज आणि माझा सहवास कधीच विसरू नकोस,
माझ्या प्रेमाची उब कायम ठेव. मी तुझ्यासाठी आणि मुलांच्यासाठी घेतलेल्या कष्टाची आठवण ठेव.
तू कधीच खचू नकोस.
मी इथे नसलो, माझे विचार आणि आचरण तसेच तुमच्या भविष्याची जी पायाभरणी केली आहे आणि आपला व्यवसाय आहे, त्या रुपात आणि तुमच्या बद्दल असणारे प्रेमाच्या आशीर्वादाच्या स्वरूपात माझं अस्तित्व कायम असेल.
मी जाणार आहे, पण
तुला एकटं करून नव्हे –
तर माझ्या आठवणींचा हात हातात ठेवून.
माझ्या नावाने अश्रू नको ढाळू,
माझ्या आठवणीने हसत रहा.
कारण तू हसलीस, की मला वाटेल
मी अजूनही तुझ्या श्वासात आहे.
मुलांना माझी ओळख कायम ठेव.
त्यांना सांग,
“बाबा देवाजवळ गेले आहेत,
पण आपल्याला वरून पाहतात.”
शिवाय त्यांना हे पण सांग की तुम्हाला तुमच्या बाबांसारखे बनायचं आहे, एक सजग आणि लोकांना नेहमीच मदत करणारा नागरिक व्हायचं आहे. त्यांना हे पण सांग सत्याची कास धरून चालायचं आहे आणि अन्याय सहन न करता त्याचा योग्य वेळी योग्य व्यासपिठावर आवाज उठवून प्रतिकार करावा. अन्याय कधीच सहन करू नका तसेच उभ्या आयुष्यात पैसे आणि संपत्ती, कामे मिळाली तरी चालेल पण अनीती आणि चोरी, लबाडी किंवा विश्वासात करून कोणाची फसवणूक करून द्रव्य जमा करू नका. दिनचर्या अशी बनवा की रात्री शांत झोप लागली पाहिजे...आणि पहाटे उठून व्यायाम करावा वाटला पाहिजे, असाच शिरस्ता ठेवा म्हणावं....
आणि हो नातेवाईक आणि मित्रांची हातउसनी देणी कपाटातील वहीत नोंद करून ठेवली आहे..ती नक्की परत करून टाका कोणी तुम्हाला म्हटलं नाही पाहिजे हा गेला पण पैसे बुडवले म्हणून..
आता तुझा राग राग करायला, तुला त्रास द्यायला आणि तुझी मस्करी करायला तसेच
तुझं मन मनवायला मी नसेन…
पण माझं प्रेम,
ते तुझ्या मनात कायम राहील.
मी तुझ्या हृदयात
हळूच जागा करून घेतली आहे –
आता मी तिथेच राहीन…।
आता तुला वाट पाहायला मी नसेल
आणि तुला हट्ट पण करायला मी नसेल
तसेच तो मोगऱ्याचा गजरा तुला आवडायचा
पण आता गजरा माळायला मी नसेल
आता तुझ्या सौभाग्याचे लेणं आणि कपाळाच्या कुंकवाच देणं नसेल नसेल...
मला गोड आवडतं म्हणून आता तुला नेहमी गोडधोड करायला लागणार नाही....
आता तुला पुण्याला फिरायला आणि माहेराला घेऊन जायला मी नसेल.....
आता तुळशी बाग असेल पण मी नसेल आणि मी नसेल तर तुझी तुळशीची बाग फुलणार नाही..
महागडी उंची, भरजरी आणि जरी काठी वाली पैठणी शेवटी मला कधीच घेता आली नाही...
पण एक मात्र नक्की होत साडी कोणत्याही रंगाची असो ती तुला खूप खुलून आणि चांगली दिसायची....
त्यासोबत,
आणखी एक मात्र राहून गेलं सोन्याच्या पाटल्या, बांगड्या अन एक मोठा हिऱ्या मोत्यासह सोन्याचा हार अखेर बनवायचा राहिलाच की....
तू उभ्या आयुष्यात सर्वांच केलं मला सरते शेवटी तुझी सेवा करायची संधी लाभावी असे मी नहमी देवाकडे मागण्या मागायचो पण देवाने माझ्यावर अन्याय केला आहे...हे इच्छा पूर्ण झाली नाही, जमल्यास मला माफ कर मी हा डाव अर्ध्यावर मोडून जात आहे
इतकं प्रेम दिल्याबद्दल आणि
माझं जीवन अर्थपूर्ण केल्याबद्दल धन्यवाद…
आता शेवटी एवढंच सांगतो –
स्वतःची काळजी घे…
माझ्या आयुष्याच्या वाटेच आणि दोघांच्या जीवनाचं पुढचं पान तू लिही…
"भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी'…"
तुझाच,
शेवटपर्यंत तुझ्यावर प्रेम करणारा,
तुझा पती.
✍️ हे केवळ पत्र नाही, एक सत्य घटना असून त्यामधून एका पतीचं शेवटचं सावरणं,
पत्नीवरील विश्वास, प्रेम आणि जबाबदारीचं भावनिक प्रतिबिंब आहे. 💔
1 Comments
काय लिहिले आहे 🙏🥲
ReplyDeleteधन्य आहे त्यांच प्रेम आणि ते...
POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH