Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विहिरीत राजमहाल असललेली एकमेवाद्वितीय विहीर, बारा मोटची विहीर लिंब, सातारा




विहिरीत राजमहाल असललेली एकमेवाद्वितीय विहीर, बारा मोटची विहीर 
लिंब, सातारा



सातारा शहर म्हटलं की ऐतिहासिक वास्तू राजवाडा किल्ले आणि सातारा राजधानी हा विचार लगेच डोक्यात येतो आणि सर्व गोष्टी नजरेसमोर येतात. सातारा नगरीच्या उत्तरेस अगदी जवळ १३ किमी अंतरावर कृष्णा नदीच्या उजव्या तीरावर मौजे लिंब नावाचे गाव आहे. या गावात एक अनोखी एक विहीर आहे. ऐतिहासिक शिवकालीन स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना म्हणून ही विहीर आणि तिच्यावर बांधलेला महाल आजही प्रेरणा देत आहे.

या विहिरीचे बांधकाम हे शके १६४१-१६४५ या कालावधीत छत्रपती श्री. संभाजीपुत्र छत्रपती शाहू राजे भोसले ( पहिले ) यांच्या पत्नी श्रीमंत विरुबाई भोसले यांनी करून घेतले आहे. शिवकालीन स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना म्हणजे ही शेरी लिंब गावची बारा मोटांची सुंदर आणि प्रसिद्ध विहीर. 

ह्या विहिरीच्या अवती भवती असलेल्या ३३०० आंब्यांच्या आमराईला व गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या या विहिरीवर पाणी उपसण्यासाठी तब्बल एकूण बारा मोटा लावल्या जात होत्या. तसेच पूर्वी पाणी उपसण्यासाठी मोटा असायच्या आणि त्या मोटा ओढायला बैल असायचे जे मोट ओढण्याबरोबर शेतीची पण कामे करत असत. 

 खरं तर ह्या विहिरीवर पंधरा मोटा आहेत. म्हणजे ही विहीर १५ मोटा असलेली विहीर आहे. पण नियमीतपणे पाणी वापरण्यासाठी बारा व दुरूस्ती देखभालीसाठी वापरण्यात येणाऱ्या तीन अशा एकूण पंधरा मोटांची थारोळी आजही विहिरीच्या कडेन बघायला मिळत आहे. 

ह्या ऐतिहासिक बारा मोटांनी पाणी उपशाची व्यवस्था विहिरीचे वैशिष्ट्य असून, वरून पाहिली असता ही विहिर एका शिवलिंगाच्या आकारात दिसते आहे. मुख्य विहीर आणि तिला जोडलेल्या दोन उपविहिरी असे जरी प्रथमदर्शनी बांधकाम दिसत असले तरी या तिन्ही विहिरींना जोडणारे बांधकाम म्हणजे चक्क एक सुंदर आणि प्रसिद्ध राजमहाल आहे. हेच या विहिरीचे आकर्षण आणि खास वैशिष्ट्य आहे. हेच पाहण्यासाठी लोक दूरदूर वरून येत असतात. 

सदरच्या विहिरीचा व्यास ५० फूट आणि खोली ११० फूट असून आकार अष्टकोनी आणि शिवलिंगाकृती आहे. येथे मोडी लिपीतील एक शिलालेख आहे जो माहिती दर्शवित आहे. जमिनीखालील महालात ही विहीर आहे. महालाच्या मुख्य दरवाजावर कलाकुसर केलेली आहे. आतील बाजूस शरभाची दगडी मूर्ती आहे. महालात विविध चित्रे कोरली आहेत. गणपती, हनुमान, कमलपुष्पे अशी अनेक शुभशिल्पे तर दिसतातच मात्र त्यांसोबत विशेष म्हणजे हत्तीवर आणि घोड्यावर विराजमान झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प देखील ह्या खांबावर कोरलेले दिसते. विहिरीला प्रशस्त असा जिना आणि चोरवाटा आहेत. विहिरीवर १५ थारोळी आहेत. ह्या चोरावाटांतून वर आले की १२ मोटांची जागा, दरबाराची आणि सिंहासनाची जागा बघायला मिळते.


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कुटुंबाची संपूर्ण 

माहिती येथे वाचा


प्रत्यक्ष मूळ विहिरीत प्रवेश करण्याआधी आड विहीरी साठी प्रशस्त पायऱ्या आणि एक भक्कम पूल आहे. तेथूनच छुप्या महालात आणि विहिरीत जाण्यासाठी तसेच शत्रूपासून निसटण्या साठी छुप्या भुयारी वाटा आहेत. महालात गणपती, हनुमान, कमलपुष्पे अशी अनेक शुभशिल्पे उत्तर दिशेला दिसतात. (भारतीयांसाठी परकीय आक्रमणे उत्तरेकडून च होत असल्याने या दिशेचा संदर्भ इथे महत्त्वाचा ठरतो)

विहिरीच्या दक्षिणेकडे असलेल्या शिल्पात वाघाच्या पायाखाली हत्तीचे रूप असून दक्षिण प्रांत मराठ्यांनी पादाक्रांत केल्याची प्रतीकात्मकता त्यात दिसून येते. उत्तरेकडे असलेल्या शिल्पात आकाशाकडे डरकाळी फोडणाऱ्या वाघाच्या रुपात उत्तरेकडील वर्चस्व वाढवण्याचे भविष्यातील लक्ष्य प्रतिबिंबित होते. (याची प्रचिती अटकेपार झेंडा रोवून मराठ्यांनी जगाला दिलीच) वाघाचा चेहरा आणि सिंहाच्या शरीराचे शिल्प शौर्य आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते. अशीच महालातील प्रत्येक शिल्पाची आणि दगडी खांबावरील कोरीव कामाची योजना गूढ आणि प्रतीकात्मक आहे.

ही विहीर सुंदर स्थापत्यशास्त्रचे उत्तम उदाहरण आहे. 


पुणे कोल्हापूर महामार्गावर लिंब या गावात ही विहीर असून जाण्यासाठी चांगला रस्ता तयार केला आहे. पुणे ते कोल्हापूर प्रवास करताना आवर्जून भेट द्यायला हरकत नाही. 





Post a Comment

0 Comments

close