Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

छत्रपती शाहू महाराज (पहिले) समाधी लोकार्पण सोहळा गौरवगाथा

छत्रपती शाहू महाराज (पहिले) समाधी लोकार्पण सोहळा गौरवगाथा

छत्रपती संभाजी महाराजांचे चिरंजीव असलेले छत्रपती शिवाजी महाराज दुसरे ह्यांना आपण सर्व जण छत्रपती शाहू महाराज पहिले ह्या नावानेही ओळखतो.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, येसूबाईसाहेब छत्रपती, ताराराणीसाहेब छत्रपती ह्यांनी रक्त शिंपून उभ्या केलेल्या मराठ्यांच्या स्वराज्याच्या कक्षा छत्रपती शाहू महाराजांनी दक्षिणेतील जाफना श्रीलंकेपासून उत्तरेकडील हिमालयापर्यंत आणि पूर्वेकडील बंगालपासून पश्चिमेकडील अटकपर्यंत पसरवून अखंड हिंदुस्थान हा मराठ्यांच्या भगव्या झेंड्याखाली आणुन एकसंध संरक्षित केला.
"अखंड हिंदुस्थानवर मराठ्यांचा भगवा डौलाने फडकला पाहिजे" हे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न त्यांचे नातू छत्रपती शाहू महाराज पहिले ह्यांनी पूर्ण केले.


१५ डिसेंबर १७४९ रोजी छत्रपती शाहू महाराज ह्यांचे साताऱ्यात निधन झाले.
सातारा येथील कृष्ण-वेण्णा नद्यांच्या संगमावर असलेल्या संगम माहुली येथे छत्रपती शाहू महाराज ह्यांचे समाधीस्थळ आहे. 
१५ डिसेंबर २०२० रोजी ह्या समाधीस्थळास  २७० वर्ष पूर्ण होतील.
नदीचे पात्र हे वालुकामय असल्यामुळे दर वर्षीच्या पुराच्या पाण्यात वाळूचे थरावर थर चढून हे समाधिस्थान लुप्त होत असे.
ज्या छत्रपती शाहू महाराजांनी मराठ्यांचे राज्य आसेतु हिमाचल वाढविले त्या छत्रपतींच्या समाधीस्थळाच्या दुरावस्थेकडे पाहून प्रत्येक व्यक्तीस अतीव दुःख होऊन त्याच्या डोळ्यांच्या कडा ओलावत असत.
महत्वाचे: 
दुःख उगाळत न बसता आपण ह्या समाधीच्या पुर्ननिर्माणासाठी काही भरीव कार्य केले पाहिजे ज्याने पुन्हा कोणाच्या डोळ्यांच्या कडा ओलावू नयेत ह्या संकल्पनेतून सातारा येथील श्री.अजय वीरसेन जाधवराव आणि धीरेंद्र राजपुरोहित ह्यांनी ऑक्टोबर २०१८ साली राजमाता कल्पना राजे भोसले छत्रपती ह्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसमूहातून समाधी स्थळाच्या पुनर्निर्माणाचे कार्य हाती घेतले.
लोक-समूहातून हे कार्य होणार असल्याने कोणीही कसलीही अपेक्षा न ठेवता आपापल्या परीने ह्या कार्यास सढळ हाताने मदत केली.
ह्या समाधीस्थळाच्या पुनर्निर्मितीचे कार्य कसे केले ह्याची माहिती पुढीलप्रमाणे:
समाधी-पुनर्निर्माण कार्य सुरु करण्याअगोदर निष्णात आर्किटेक्ट, इंजिनियर ह्यांची मदत घेतली गेली.
मूळ समाधी स्थान हे नदीपात्रापासून ९ फूट खोल आहे. वालुकामय स्थितीमुळे समाधीस पाया नाही. मूळ समाधी स्थानावर एक ९ इंच लांब आणि ९ इंच रुंद फोटो फ्रेम सारखी शिसवाची लाकडी चौकट असून ह्या शिसवाच्या चौकटीवर हे सगळे समाधीस्थळाचे मूळ बांधकाम उभे केले होते.
ह्याच मूळ बांधकामास किंचितही बाधा पोहचवू न देता ह्या समाधीस्थळाच्या मूळ शिसव चौकटीपासून ५ फुटापर्यंत मजबुतीकरण गेले गेले. 
त्या पाच फुटांवर RCC बांधकाम करून त्या RCC बांधकामावर RCC खांब उभे केले. 
मग बाजूने दगडी काम केले. 
म्हणजे ह्या समाधीस्थळाचे तीन पद्धतीने काम केले गेले. मजबुतीकरण,  RCC बांधकाम आणि त्यावर असलेले दगडी घडीव काम.
(RCC: Reinforced Cement Concrete)



चालू स्थितीत असलेले हे बांधकाम २०१९ साली पुराच्या पाण्याखाली गेले होते. सलग तीन दिवस हे बांधकाम पुराच्या पाण्याखाली होते. 
परत २०२० साली हे चालू स्थितीत असलेले बांधकाम अर्धे पाण्याखाली गेले होते. परंतु नवीन बांधकाम हे उच्च दर्जाचे असल्यामुळे पुराच्या पाण्याने नवीन बांधकामास कुठलीही बाधा पोहचली नाही.
समाधीस्थानाचा चबुतरा हा ११ फूट लांब आणि ११ फूट रुंद आहे. पूर्ण बांधकाम हे २२ फूट उंच आहे.
'छत्रपती शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांची सावली आहेत' असे वर्णन इतिहासाचे अभ्यासक करतात.
ह्याच संकल्पनेचा उपयोग हे समाधी पुनर्निर्माण करताना केला गेला.
अत्यंत अत्यंत महत्वाचे: 
नदीच्या वाळवंटात समाधीची सावली पडली तर ती सावली रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानासारखी दिसते.
आणि ह्याही पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचीही प्रेरणा  ह्या नवीन समाधी पुनर्निर्माणात घेतली गेली आहे. 
ह्या समाधीचे छत हे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीसारखे बनविले गेले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थानांचा एकत्र 'दृश्यभास मिलाप' आपल्याला संगम माहुली येथे  छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थानात आता पहायला मिळेल. 
पहा किती अलौकिक कार्य आहे हे.
**
१५ डिसेंबर २०२० रोजी छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त संगम माहुली येथे राजमाता कल्पनाराजे भोसले छत्रपती ह्यांच्या हस्ते ह्या समाधी स्थानाचा लोकार्पण सोहळा आयोजित केलेला आहे.
सातारा येथील श्री अजय वीरसेन जाधवराव आणि धीरेंद्र राजपुरोहित आणि ज्ञात अज्ञात सर्व मदतनीसांनी ह्या समाधीस्थळाच्या पुनर्निर्मानाचे जे अलौकिक कार्य केले आहे ते सूर्य-चंद्र पृथ्वीवर असूपर्यंत सर्व जनांस कीर्तिमान प्रेरणा देत राहील.
१५ डिसेंबर २०२० मंगळवार रोजी सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत हा सोहळा असणार आहे. रात्रीच्या वेळेस समाधीस्थानावर प्रकाशयोजना केलेली आहे.
हा मराठ्यांच्या इतिहासाचा गौरव आहे. 
हा गौरव आपण प्रत्येकाने मनामनात आणि घराघरात पोहचविला पाहिजे. आपण प्रत्येकाने ह्या समाधीस्थळास वेळ मिळेल तेंव्हा आवर्जून भेट द्यावी.
ह्या कार्यासाठी दिवसरात्र कष्ट घेतल्याबद्दल पुनश्च एकदा आम्ही सर्व छत्रपतींचे लोक हे राजमाता कल्पनाराजे भोसले छत्रपती, श्री.अजय वीरसेन जाधवराव, श्री.धीरेंद्र राजपुरोहित, कॉन्ट्रॅक्टर, आर्किटेक्ट, इंजिनियर आणि ज्ञात-अज्ञात सर्व मदतनिसांचे आभार व्यक्त करतो.


टीप: हा लेख खूप शेअर करावा हि विनंती. 
लेख समाप्त.
लेखाविषयी तुमची प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये कळवा आणी आपल्या महाराष्ट्र धर्मवर मित्रमंडळींना 'Invite' (आमंत्रित) करा.
श्री भवानी शंकर चरणी तत्पर 
सतीश शिवाजीराव कदम 
निरंतर

Post a Comment

0 Comments

close