Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत पर्यटकांच्या जीवाशी खेळ विना सुरक्षा बेकायदेशीर बोटिंग सुरू पुण्याच्या सजग नागरिकाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार


श्री क्षेत्र नृसिंहवाडीत पर्यटकांच्या जीवाशी खेळ; विना-सुरक्षा बेकायदेशीर बोटिंग सुरू, पुण्याच्या सजग नागरिकाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार



विशेष प्रतिनिधी, नृसिंहवाडी (कोल्हापूर ) : कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र नृसिंहवाडी (नरसोबावाडी) येथील दत्त मंदिर घाटावर कृष्णा नदीच्या पात्रात पर्यटकांच्या सुरक्षेचा पुरता बोजवारा उडाल्याचे समोर आले आहे. स्थानिक व्यावसायिकांकडून कोणतीही सुरक्षा न बाळगता, नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर बोटिंग व्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पुणे येथील सजग नागरिक श्री. अर्जुन लहानबा सैद यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (CEO) लेखी तक्रार करून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

सोशल मीडियावरील व्हिडिओमुळे प्रकार उघड : 

सध्या नृसिंहवाडी येथे दत्त मंदिर दर्शनासाठी भाविक व पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. येथील कृष्णा नदीच्या पात्रात पर्यटकांना बोटीतून सफर घडवून आणली जाते. मात्र, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स (फेसबुक व यूट्यूब) वर काही व्हिडिओ समोर आले असून, त्यामध्ये बोट चालकांचा निष्काळजीपणा स्पष्टपणे दिसून येत आहे.

तक्रारीत नमूद केलेले गंभीर मुद्दे :

अर्जदार अर्जुन सैद यांनी प्रशासनाचे लक्ष वेधताना खालील महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत:

१. लाईफ जॅकेटचा पत्ताच नाही : बोटीमध्ये लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने बसलेले आहेत, मात्र एकाही प्रवाशाने 'लाईफ जॅकेट' घातलेले नाही.

२. सुरक्षा साधनांचा अभाव :  आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी बोटीवर कोणतेही बचाव साहित्य उपलब्ध नाही.

३. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी : नियमांना हरताळ फासत बोटीच्या क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त प्रवाशांना नदीपात्रात फिरवले जात आहे.


हाच तो व्हिडिओ जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे येथे क्लिक करून पाहू शकता


अपघाताची वाट पाहणार का? नागरिकांचा सवाल

नदीपात्रातील पाण्याचा वेग आणि खोली पाहता, अशा प्रकारे विना-सुरक्षा बोटिंग चालवणे म्हणजे निष्पाप नागरिकांच्या आणि लहान मुलांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. "भूतकाळात अशा बेजबाबदारपणामुळे महाराष्ट्रात अनेक मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत, त्यामुळे प्रशासनाने कोणतीही जीवितहानी होण्याची वाट न बघता यावर आधीच कठोर प्रतिबंधात्मक पावले उचलणे गरजेचे आहे," असे अर्जुन सैद यांनी आपल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.


कृष्णा नदीवरील बोटिंगचा हाच व्हायरल झालेला व्हिडीओ

बोटिंग बंद करण्याची मागणी 

नुकताच पिकअप गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीत पडून बालकांसह नागरिकांना मृत्यूस सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन संबंधित बोट चालक आणि मालकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, नृसिंहवाडी ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासनाने 'लाईफ जॅकेट' आणि सर्व सुरक्षा नियमांचे पालन सक्तीचे केल्याशिवाय तेथील बोटिंग व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवावा, अशी आग्रही मागणी या अर्जाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. आता यावर प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment

0 Comments

close