"धर्मादाय रुग्णालयातील मोफत उपचार आणि प्रशासकीय उदासीनता: मुख्यमंत्री व धर्मादाय आयुक्तांच्या हस्तक्षेपाची तातडीची गरज."
धर्माधाय रुग्णालयात गरीब आणि निर्धन लोकांना उपचार का मिळत नाही? वाचा : धर्माधाय रुग्णालयात गरीब आणि निर्धन लोकांना उपचार का मिळत नाही? तर त्यासाठी खालील गोष्टींची पूर्तता व्हयला हवी, नागरिकांनी खालील माहिती हि मुख्यमंत्री आणि धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अंमलबजावणीची मागणी करावी.....
मा. धर्मादाय आयुक्त,
धर्मादाय आयुक्त भवन,
८०, डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी,
मुंबई - ४०००१८.
विषय : माहिती अधिकार कलम ४ अन्वये आणि महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमाच्या कलम ४१-अ नुसार माहिती प्रसिद्ध करणे आणि योग्य ती कारवाई करणे बाबत,
मा. महोदय,
वरील विषयास अनुसरून आपल्याकडे तक्रार दाखल करत आहे. राज्यातील धर्मादाय रुग्णालयांनी पारदर्शकता राखण्यासाठी आणि रुग्णांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमाच्या कलम ४१-अ नुसार काही महत्त्वाची माहिती रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर किंवा दर्शनी भागात (Reception/Notice Board) लावणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे.
प्रामुख्याने सर्व रुग्णालयांनी खालील प्रकारच्या तीन योजनांची माहिती प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.
१) धर्मादाय खाटा योजना (Charity Beds) किंवा "निर्धन आणि दुर्बल घटकांसाठीची योजना"(Scheme for Indigent and Weaker Section)
२) महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY)
३) आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY)
वरील ३ योजनांची माहिती प्रामुख्याने खालीलप्रमाणे असायला प्रसिद्ध करावी :
१. राखीव खाटांची माहिती (Current Bed Status)
रुग्णालयाने दररोज एका डिजिटल किंवा मोठ्या फलकावर खालील माहिती दररोज अद्यावत/अपडेट करणे आवश्यक आहे.
निर्धन रुग्णांसाठी (Indigent) : एकूण १०% राखीव खाटांपैकी किती भरल्या आहेत आणि किती रिकाम्या आहेत.
दुर्बल घटकांसाठी (Weaker Section) : एकूण १०% राखीव खाटांपैकी उपलब्ध खाटांची संख्या.
ही माहिती रिअल-टाइममध्ये (Real-time) अद्यावत/अपडेट होणे गरजेचे आहे जेणेकरून रुग्णांना खाटा उपलब्ध आहेत की नाही हे त्वरित समजेल.
२. सवलतींचे निकष / पात्रता फलक आणि कागदपत्रे
रुग्णांना सवलत मिळवण्यासाठी काय पात्रता लागते आणि कोणती कागदपत्रे लागतात याचा स्पष्ट उल्लेख असलेला फलक मराठी आणि इंग्रजी भाषेत स्पष्ट लावलेला असावा :
निर्धन रुग्ण : वार्षिक उत्पन्न ₹१,८०,००० पर्यंत पूर्णपणे मोफत उपचार.
दुर्बल घटक : वार्षिक उत्पन्न ₹३,६०,००० पर्यंत ५०% सवलत.
आवश्यक कागदपत्रे : पिवळे/केशरी रेशनकार्ड, तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला किंवा अंत्योदय कार्ड यापैकी जे आवश्यक आहे त्याची यादी.
रुग्ण दाखल करतेवेळी तात्पुरती कोणती कागदपत्रे सादर करावी लागतात याची माहिती.
तहसीलदार यांच्याकडून मिळणारा उत्पन्नाचा दाखला हा किती दिवसांत सादर करावा. त्यामध्ये शासकीय सुट्या असेल तर ते पण नमूद करावे.
सवलतीत उपचार घेण्यासाठी अर्थात धर्मादाय रुग्णालयाअंतर्गत मोफत उपचार घेण्यासाठी जो अर्ज आहे, त्याची प्रत दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे.
धर्मादाय रुग्णालय अंतर्गत मोफत उपचार घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कोणत्या वेबसाईट वरती करावा त्या वेबसाईटची लिंक आणि ई-मेल आयडी दर्शनी भागात लावण्यात यावा.
धर्मादाय रुग्णालयाअंतर्गत मोफत उपचार घेण्यासाठी रुग्णाने कोणती कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. त्या कागदपत्राची यादी लेखी किंवा छापील प्रत रुग्णाला किंवा रुग्णाच्या नातेवाईकांना देणे बंधनकारक करावे. ही प्रत दर्शनी ठिकाणी अक्षरात किंवा डिजिटल बोर्डावर लावण्यात यावी.
फक्त IPF Office आणि आयपीएफ ऑफीस असा फलक लावला आहे, याऐवजी सपूर्ण मराठीत समजेल असा नाम फलक लावावा.
'नि:शुल्क उपचार सहाय्यता कक्ष'
“गरीब गरजू रुग्ण मदत केंद्र'
'वैद्यकीय साहाय्य कक्ष'
'धर्मादाय रुग्णालय मोफत उपचार विभाग'
किंवा अन्य जे कायदेशीर आधार असेल असे फलकावर नमूद करावे.
३. मदत कक्षाची (Help Desk) माहिती
रुग्णालयामध्ये एक 'वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता' (Medical Social Worker) असणे अनिवार्य आहे.
या कार्यकर्त्याचे नाव, पद, बसण्याची जागा आणि त्याचा संपर्क क्रमांक दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे, जेणेकरून गरजू रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हे त्यांच्याशी सवलतीबाबत संपर्क साधू शकतील.
४. तक्रार निवारण यंत्रणा
जर रुग्णालयाने उपचार नाकारले किंवा सवलत देण्यास टाळाटाळ केली, तर रुग्ण कोणाकडे तक्रार करू शकतात याची माहिती असावी :
संबंधित जिल्ह्याच्या धर्मादाय आयुक्तांचा (Charity Commissioner) पूर्ण पत्ता, मोबाईल फोन क्रमांक आणि ईमेल आयडी.
मा. धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य (Charity Commissioner) पूर्ण पत्ता, मोबाईल फोन क्रमांक आणि ईमेल आयडी.
रुग्णालयातील सक्षम अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांक, पूर्ण पत्ता आणि ईमेल आयडी.
आवक जावक विभाग
वरीलप्रमाणे मराठी भाषेत फलक लावण्यात यावे.
५. औषधे आणि उपचारांवरील सवलत
निर्धन रुग्णांना औषधे, तपासण्या आणि निवास खर्च पूर्णपणे मोफत मिळतो, तर दुर्बल घटकांना यामध्ये ५०% सवलत मिळते. हे स्पष्ट करणारे नियम आणि अटी फलकावर प्रसिद्ध केलेले असावेत आणि हा फलक दर्शनी भागात लावण्यात यावे.
धर्मादाय आयुक्त कार्यालयाची भूमिका
धर्मादाय आयुक्त कार्यालयाने देखील माहिती अधिकार कलम ४ अन्वये आणि महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमाच्या कलम ४१-अ नुसार त्यांच्या स्वतःच्या कार्यालयात सूचना फलकावर आणि वेबसाईटवर खालील माहिती प्रसिद्ध करणे आवश्यक आणि बंधनकारक आहे.
जिल्ह्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांची अद्ययावत यादी.
प्रत्येक रुग्णालयात एकूण किती खाटा धर्मादाय कोट्यासाठी मंजूर आहेत.
आयपीपी (IPP - Indigent Patient Fund) मधील निधीचा वापर कसा केला जात आहे याची संक्षिप्त माहिती.
रुग्णालयानुसार नियुक्ती केलेल्या अधिकारी यांचे नाव, पदनाम, पत्ता, संपर्क क्रमांक आणि ईमेल.
धर्मदाय रुग्णालयाअंतर्गत मोफत उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये रुग्णाची सादर करावयाची कागदपत्रांची यादी प्रसिद्ध करणे.
मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या वेबसाइटवर माहितीचे अनेक पर्याय उपलब्ध आहे, पण त्यावर गेल्यावर कोणत्याही प्रकारची माहिती तिथे उपलब्ध नाही.
जसे की बेड उपलब्धता आणि हॉस्पिटल तपशील हे पर्यायावर गेल्यावर कोणत्याही प्रकारची माहिती तिथे उपलब्ध नाही तर ही माहिती उपल्ब्ध करून द्यावी.
राज्यातील आणि पुण्यातील अनेक मोठी आणि नामांकित रुग्णालये धर्मादाय आयुक्तालयाच्या (Charity Commissioner) अंतर्गत येतात. 'महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमा'नुसार या रुग्णालयांमध्ये गरीब आणि गरजू रुग्णांसाठी एकूण खाटांपैकी २०% खाटा राखीव ठेवणे बंधनकारक असते (१०% पूर्णपणे मोफत आणि १०% सवलतीच्या दरात).
पुण्यातील धर्मादाय अंतर्गत येणारी काही प्रमुख रुग्णालये खालीलप्रमाणे आहेत :
१. प्रमुख मल्टी-स्पेशालिटी रुग्णालये:
रुबी हॉल क्लिनिक (Ruby Hall Clinic) : ससून रोड, वानवडी आणि हिंजवडी.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय (Deenanath Mangeshkar Hospital) : एरंडवणे.
जहांगीर हॉस्पिटल (Jehangir Hospital): पुणे स्टेशनजवळ.
पुना हॉस्पिटल (Poona Hospital & Research Centre) : नवी पेठ.
सह्याद्री हॉस्पिटल (Sahyadri Hospital) : कर्वे रोड, डेक्कन आणि इतर शाखा.
संचेती हॉस्पिटल (Sancheti Hospital) : शिवाजीनगर (अस्थिरोगासाठी प्रसिद्ध).
आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल : चिंचवड.
इनलॅक्स अँड बुधराणी हॉस्पिटल : कोरेगाव पार्क.
भारती हॉस्पिटल (Bharati Hospital): कात्रज.
२. इतर महत्त्वाची धर्मादाय रुग्णालये :
के.ई.एम. रुग्णालय (KEM Hospital) : रास्ता पेठ.
Hardikar Hospital : गणेशखिंड रोड.
Noble Hospital : हडपसर.
Inamdar Hospital : फातिमा नगर.
माणिकचंद धारीवाल हॉस्पिटल : शिरूर.
पुरूषोत्तम शास्त्री नानल हॉस्पिटल : कर्वे रोड
.
वरीलप्रमाणे सर्व प्रकारची माहिती ही वर नमूद केलेल्या संबंधित सर्व रुग्णालयांना धर्मादाय आयुक्त कार्यालयाने प्रसिद्ध करण्याचे आदेश द्यावे. त्याचप्रमाणे सर्व धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाने वर नमूद केलेली माहिती प्रसिद्ध करावी अशी मागणी करत आहे.
सूचना : सर्वात प्रथम अति तातडीने रूबी हॉल क्लिनिक पुणे आणि जहांगीर हॉस्पिटल पुणे यांना तत्काळ योग्य ते अर्जानुसार आदेश द्यावे हि विंनती आहे.
आपला विश्वासू
श्री.
मु. पो. कोरेगाव भीमा , तालुका - शिरूर,
जिल्हा - पुणे -४१२२०८.
मो. क्र.
ईमेल -
वरील माहिती copy करून खालील इमेल वर पाठवा अथवा लेखी पत्रव्यवहार करावा...
धर्मादाय आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य (मुंबई मुख्य कार्यालय)
ईमेल आयडी: commr@maha-charity.org
धर्मादाय सह आयुक्त, पुणे विभाग (Charity Joint Commissioner)
ईमेल आयडी: jccpune@maha-charity.org
#Poor_patients, #Charity_hospital, #Treatment


0 Comments
POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH