बाप आहे तोवर गठ्ठ मिठी मारूनच घ्या.... तीर्थरूप अण्णा
वडील जाणें हे मनाला खूप वेदनादायी आहे. बाप घरी नाही हे मनाला पटत नाही आणि सहन पण होत नाही. आता दररोजची कामे आणि जीवन जगणे यातील आनंद राहिला नाही?
अनेकांनी मला सांगितलं की दुःख १३ वा झाला की संपते…मी म्हटलं अरे बाप मेला आहे ते दुःख आणि सुतक आयुष्यभर राहते…आता माझा बाप परत येणार नाही, हे माहिती आहे, पण अकाली जाणे वेदनादायी आहे.
माझा बाप जाऊन दोन महिने झाले आहे. मला तर बापाविणा जीवनाची कल्पनाच ?..
माझा जन्म हा सन १९७७ सालचा आहे. माझं नाव कागदोपत्री जरी अर्जुन असले तरी आजोबांनी (आईचे वडील कान्होजी गोपाळा हरगुडे) लाडाने मल्हारी नाव ठेवले आणि तेच रूढ झाले. आम्ही एकूण चार भाऊ आणि एक बहिण आहोत.
आम्ही सर्व भावंडे वडिलांना ‘अण्णा’ या नावाने हाक मारत असे…आणि अण्णा सणसवाडीकरांचे जावई होते, त्यामुळे त्यांना सैद पाहणे हे नाव रूढ झाले होते. तीच वडिलांची उपाधी आम्हाला सर्व भावंडांना लाभली आहे.
पाव्हणं!......
मला काही पुसटसे तर काही चांगलं आठवत आहे. तेंव्हा माझे वडील अण्णा हे POND'S INDIA मुंबईमध्ये कार्यरत होते. आमचे मूळ गाव आदर्श गाव गावडेवाडी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे हे आहे. आई आणि अण्णा लग्नानंतर माझ्या मामाच्या गावाला नविन शेती आणि घर घेऊन राहायला होते. गावात त्यांनी जुनी पिठाची गिरणी असलेला हरगुडे यांचा दंडावरील वाडा तेव्हा विकत घेतला होता. त्यातच राहायला दोन घरे होती तर बाहेर गुरांचा गोठा होता.
पण अण्णा अजूनही मुंबईत Pond's India मध्ये कामाला होते. आम्ही काही दिवस घाटकोपर मुंबई येथे राहत होतो.
मुंबईमध्ये सणसवाडी गावातील अनेक कुटुंब राहत होती. त्यांची नेहमी आमच्या घरी ऊठबस असायची. विशेषता श्री. वामनराव दरेकर, श्री. शांतीलाल दरेकर, कै. बबनराव दरेकर, कै. मारुती दरेकर आणि गावातील आणखी बरीच दरेकर मंडळी मुंबईला होती.
माझ्या वडिलांबरोबर म्हणजेच आमच्या अण्णांच्याबरोबर त्यांचे थोरले बंधू कै. शंकर जबाजी सैद आणि आणि रामभाऊ जबाजी सैद हे सुद्धा pond's कंपनीमध्ये कामाला होते. काही वर्षानंतर आमच्या वडिलांचे थोरले भाऊ म्हणजे आमचे थोरले चुलते शंकर सैद हे राजीनामा देऊन गावाला शेती करायला आले होते. रामभाऊ सैद हे हे भाईंदर मुंबई या ठिकाणी राहत होते. जेंव्हा अण्णा मुंबईतून सुट्टी काढून सणसवाडीला घरी सणासुदीच्या दिवशी आणि यात्रेला यायचे तेंव्हा येताना आम्हाला खायला पापडी आणि टोला घेऊन यायचे ते आमच्यासाठी लई अप्रूप असायचे. Pond's कंपनी मध्ये आल्यामुळे घरी येताना अण्णा पावडर, साबण, स्नो, शाम्पू असे अनेक गोष्टी घेऊन येत असत. गावात कोणाला लागले, खरचटलं तर घरी येऊन पावडर घेऊन जायचे आणि जखमेवर लावायचे. आमच्या गावचे न्हावी राजाभाऊ मोरे यांना तर अनेक वर्ष सर्व साहित्य देत असत. त्या बदल्यात राजाभाऊ मोरे यांनी आमच्या कुटुंबाच्या केस कर्तनाचे कधीच पैसे घेतले नाही.
दुष्काळानंतरचा काळ म्हणजे सन १९८० ते जवळपास १९९० पर्यंत सणसवाडी गावामध्ये अशी विशेष काही प्रगती झालेली नव्हती. माझ्या वडिलांनी म्हणजे आमच्या अण्णांनी मी इयत्ता दुसरी मध्ये शिकत असताना अंदाजे सन १९८५ दरम्यान Pond's India कंपनीचा राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर आण्णांनी पूर्णवेळ शेती करण्याचे नियोजन केले होते. मुंबईला आम्ही ज्या ठिकाणी घाटकोपरला राहत होतो त्या ठिकाणी आमची एक खोली होती, त्याच ठिकाणी आमचे कुटुंब राहत होते. त्यावेळी अण्णांनी ती खोली अंदाजे ५० ते ७० हजार रुपयाला विकली होती. त्या पैशातून गावाला अण्णांनी विहिरीच खोदकाम करून घेतले, त्यानंतर विहिरीवर डिझेल इंजिन बसवले आणि चार पाच एकरामध्ये पाण्याची पाईपलाईन करून बागायती जमीन करून घेतली होती. शेती, बैलगाडी, बैल आणि सर्व गोष्टी उभ्या केल्या होत्या. पण मुंबईत घर नाही याची सल अजूनही कायम आहे….
मला आठवतंय घरामध्ये लागणारे तेल, डाळी, कडधान्य, भाजीपाला, गहू, ज्वारी, बाजरी ही सर्व पिके अण्णा आणि आई स्वतःच्या शेतामध्ये दरवर्षी घेत असत. अण्णा मोठ्या कष्टाने दरवर्षी एक ट्रक कांदा आणि एक ट्रक बटाट्याची मुंबईला पाठवत जात असे.. आणि तरकारी पिके म्हणजे भाजीपाला पण घेत असत. मला आठवतंय १९८५/८६ दरम्यान लहान भावाला म्हणजे पांडुरंगसाठी दूध हवे होते, तर अण्णांनी चाकणला जाऊन जनावरांच्या बाजारातून एक चांगली म्हैस विकत आणली होती. म्हैस घरी आल्यानंतर म्हशीचे जुने मालक बरोबर आले होते, त्यावेळी अण्णांनी काही रुपये देऊन इसार दिला होता. उर्वरित पैसे देण्यासाठी अण्णांनी सायकल काढली आणि तळेगाव ढमढेरेच्या एका वाण्याकडून ७०००/-रुपये घेऊन आले आणि म्हशीचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्या मालकाला सात हजार रुपये दिले होते. आणि त्या वाण्याचे पैसे पीक गेल्यावर परत दिले होते.
आमच्या म्हशीचं नाव हे सोनू होते, त्या म्हशी बरोबर आमच्या गोठ्यामध्ये एक गाय, एक शेळी आणि दोन खिल्लार जातीची करगणीवरून आणलेले बैल माणिक ठाकऱ्या सुद्धा होते. ही बैल म्हणजे अण्णांचा जीव की प्राण होते, अण्णा बैलांना खूप जीव लावत असत. लहानबा जबाजी सैद प्रसिद्ध बैलगाडा मालक म्हणून ते पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध होते. बैलगाडा शर्यतीसाठी श्री. चंदरराव तात्या केशवराव दरेकर यांचे दोन बैल आणि आमचे दोन बैल असायची. या पंचक्रोशी मधील अनेक गावच्या यात्रा उत्सवामध्ये बैलगाडा शर्यतीमध्ये भाग घेतला होता आणि फळीफोडमध्ये सुद्धा अनेक वेळा क्रमांक मारलेले आहे. तर पैलपोळा असेल तेंव्हा श्री. सोपानराव दरेकर यांच्या बैलांची जोडी असायची.
अण्णा त्यावेळी मुंबईला होते तेव्हा आमच्याकडे हलकरे आणि झालरी ही दोन गरीब बैलजोडी होती. ही बैल सांभाळायचं काम आमची आजी म्हणजे आमच्या आईची आई कै. यशोदाबाई बाबुराव दरेकर ह्या पहात असत. ते बैल अत्यंत गरीब असत कोणालाही मारत नसत. त्यांनी शेतीची खूप काम केली माझा जन्म झाल्यापासून आजी आमच्याकडेच होती, ती अगदी शेवटचा श्वास ५ डिसेंबर २०२४ मध्ये घेतला तेव्हा सुद्धा आमच्या घरी होती. आज्जी लई मायाळू होती. तिचे ऋण फेडणे या जन्मी शक्य नाही.
तर शेतीची मशागत, नांगरणी, पाळी घालणं, पेरणी करणे ही कामे श्री. सुदाम तात्या दरेकर हे आमचे सावड्या, त्यांची दोन बैल आणि आमची दोन बैल असायचे. सावड्या आणि शेजारी म्हणून अण्णांची आणि त्यांची खूप चांगली मैत्री होती. आणि राहायला जवळ असल्याने घरचे सबंध पण अगदी खूप निकटचे आणि प्रेमाचे होते आणि आहे. पुढे आमची आणि त्यांच्या घरातील मुलांशी राजेंद्र दरेकर, सर्जेराव दरेकर आणि युवराज दरेकर यांच्याशी पण मैत्री झाली आणि रक्ताच्या नात्यापेक्षा मोठं नातं निर्माण झालं होतं आणि आहे…कारण आमच्या कठीण काळात यांची मोलाची साथ होती…
शेतातील काम असो किंवा शेतात आवश्यक असणाऱ्या बाबी या सर्व अण्णांनी आणि आईने आम्हाला लहानपणापासून शिकवलेली होती. शेतामध्ये नांगरणी, पेरणी, खुरपणी, कांद्यासाठी रान तयार करणे, कांद्याला पाणी देणे, कांदा काढण्यासह ज्वारी, बाजरी, गहू, तूर पेरणी ते काढणी असेल तसेच वाल, मुग, उडीद, भुईमूग काढणे ही सर्व काम आम्हाला आई आणि अण्णांनी शिकवलेली होती आणि आहेत. त्याचप्रमाणे विहिरीतील डिझेल इंजिनला पाणी भरणे, फुटबॉल पाहणे अशी काम ही सर्व आपसूकच शिकत गेलो आणि अण्णांची काम पहात पाहत आम्ही सर्व भावंडे मोठे होत गेलो. अण्णांनी केलेले कष्ट आणि अण्णांना आईने दिलेली साथ खूप मोलाची होती. कारण दुष्काळी भाग म्हणजे शिरूर तालुका त्यात सणसवाडी म्हणजे पाण्याचे प्रमाण खूप कमी तर पावसाचं प्रमाण पण खूप कमी होते. त्यामुळे शेती करणं खूप जिकरीचं आणि अवघड काम होतं. पण अण्णांनी हार मानली नाही, नेटाने संसार चालवला आणि आम्हा सर्व भावंडांची लग्न पण शेती न विकता लावून दिली होती. अण्णांनी शेती राखली होती पुढील पिढ्यांसाठी.
कुटुंबात अनेक संकटे आली पण अण्णांनी सर्व संकटे मोडून काढली पण ते कधी कोलमडले नाही..की डगमगले नाही. पण कुटुंबातील जवळच्या तोंड फिरवली आणि अण्णांचा विश्वास तोडला…आणि जास्त काही लिहित नाही पण १९९५ ला शेती विकली गेली. अण्णांचा नाईलाज होता अण्णांना खूप दुःख झाले होते पण अण्णांनी कधी बोलून दाखवले नाही. माझं भाग्य त्यांच्या हयातीत अण्णांनी जिद्द ठेवली आणि २ एकर शेती पुन्हा नव्याने विकत घेतली होती. आणि आज ते रानं माझ्या पुढील पिढ्यांसाठी कसण्यासाठी उपलब्ध आहे.
जुनी शेती तशी घरापासून जवळपास ३.५ किलोमीटर लांब होती. त्या भागाला बोऱ्हाळीचा माथा असे म्हणत असे. तिकडच्या आठवणी तर लै आहेत…यावर खूप लिहिता येईल….
पण असो….
पण आजही असे वाटते घराच्या बाहेर पोर्चमध्ये अण्णा माझी वाट पाहत असतील...
घरी गेल्यावर मला म्हणतील....
अण्णा : "भाऊ झंडू बाम घेऊन ये..."
अण्णा : "भाऊ आता चालणं होत नाही, बाळू न्हावी यांना दाढी करायला बोलव.....
मी : हो
दुसरा दिवस
अण्णा : अरे तो बाळू न्हावी आला नाही, मला फाट्यावर दाढी करायला घेऊन चल!
मी : उद्या जाऊ या....
हा संवाद जास्त महिन्यांचा/ वर्षांचा नाही तर अगदी कमी दिवसांच्या पूर्वीचा आहे.. दवाखान्यात जाण्याअगोदर बाळू मोरे न्हावी हरिनाम सप्ताह असल्याने दाढी करायला आला नाही. मग मीच ट्रिमर मशीनने दाढी केली ती शेवटची दाढी होती. मी लहान असताना अण्णा मला राजाभाऊ मोरेकडे कटिंगला घेऊन जात असत. आणि राजाभाऊ मोरे हे पोत्यावर बसवत असे. कानावर केस आले की अण्णा खवळायचे उद्या केस कापून घरी यायचं नाहीतर घरात घेणार नाही अशी तंबी द्यायचे. लहानपणापासून खूप सक्ती असायची वेळेत घरी येणे, वेळेत शाळेत जाणे, रोज अभ्यास करणे, रात्री बाहेर जाणे नाही, टीव्ही पाहायचा नाही, व्हिडीओवर चित्रपट पाहायला जायचं नाही अशी अनेक बाबी होत्या. शेतीची आणि गुरांची कामे पण नित्यनियमाने करणे….
अण्णा : हो… अरे ते गोरडे टेलरकडून माझी अंडरवेयर आणि पायजमा शर्ट घेऊन ये…
मी : हो…
मी खोलीत गेल्या वर म्हणतील की,
अण्णा : BJP ने असे केले....शिंदे ते असे केले ठाकरे उद्धव यड आहे.....
माझा बाप हा कट्टर हिंदुत्ववादी बाप....होता
आता मला बातम्या देणार कोणी नाही?
वडील रोज बातम्या पहायचे....
क्रिकेट पहायचे...Update द्यायचे....
आणि ते हाडाचे शेतकरी होते.....
आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक पण होते,
Live बैलगाडा शर्यत पहायचे…
हे सर्व रोज मला आणि ओमला सांगायचे..
ओम आणि अण्णा हे आज्जा आणि नातू जिगरी मित्र होते....
दोघे दररोज दोन वेळा एकत्र जेवायचे....
दुपारची झोप पण घ्यायचे...दोघे सात बोलत असायचे आणि अण्णा जुन्या गोष्टी सांगत असत.
अभय आणि ओम अण्णांच्यासाठी जेवण, पाणी आणि लागणाऱ्या सर्व वस्तू द्यायचे.... लै लय काळजी घ्यायचे...
आई आणि उषा पण काय हवं - काय नको....पाहायचे....
उषा रोज चहा, नाष्टा आणि जेवण काय हवे ते द्यायचे... दुध आणि बाजरीची भाकर त्यावर साखर खूप आवडत होते... रोज खायचे....आता माझे पण दुध आणि भात बंद झाला आहे...
घरातील बहीण मंगल दिघे, पांडुरंग लहान भाऊ, बाळासाहेब मोठा भाऊ आणि वहिणी आणि इतर पण नेहमी येऊन विचारायचं काय हवं आहे... अण्णा?
अण्णा बरे आहात ना? अशी ख्याली खुशाली नेहमी विचारायचे....
त्यांना अभय, ओम आणि रिद्धीचे लग्न पहायचं होत...
भैरवीने दंगा केला की अण्णा खवळायचे तर ती म्हणायची “अण्णा तुम्ही गप्प बसा…”
अण्णा तापट आणि रागीट होते पण वयाने थकले आणि शांत झाले. हाच स्वभाव मला खटकट असे…आहे वाटत असे की माझा बाप रागीट होता तोच ठीक आहे… शांत शांत अण्णा नको असे…
पण आता सर्व संपल….
१० फेब्रुवारी २०२६ ला अण्णांना दवाखान्यात दाखल केले होते आणि शस्त्रक्रिया चांगली झाली होती. दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी मी त्यांना त्यांच्या आवडीचा शिरा खाऊ घातला होता. आणि त्यांनी पण तो प्रेमाने खाल्ला होता. मला म्हटले डाळ भात नको…. अण्णांना १४ फेब्रुवारी २०२६ रोजी घरी सोडणार होते…पण एक उलटी झाली आणि मी म्हटलं डॉक्टर एक दिवस जास्त ठेवा आज उलटी झाली आहे. पण नियतीने इथेच सर्व फेस उलट फिरवले आणि अण्णांची तबीयत अस्थिर व्हायला इथे सुरुवात झाली होती. दिनांक १४/१५ फेब्रुवारी रोजीच्या रात्री ह्या काळ रात्री होत्या. अण्णांनी धीर सोडला नाही पण शरीर साथ देत नव्हते. पण आम्हाला हे समजत नव्हते. आम्ही पार खचून गेलो होती. रात्रंदिवस अण्णाच्या ताबियतीची काळजी घेत होतो. काय हवं काय नको हे पाहत होतो पण नियतीनं आम्हाला साथ दिली नाही. अण्णा शेवटचे चार शब्द पण बोलू शकले नाही…त्यांना बोलायचं होत काहीतरी सांगायचं होत…..पण नाकातोंडात नळ्या आणि व्हेंटिलेटरवर असल्याने ते शेवटपर्यंत इच्छा असूनही बोलू शकले नाही. त्यावेळी मी विचारले अण्णा पाणी प्यायचे का? तर मान हलवून हो म्हणले…. नर्स म्हणाली पाणी देता येणार नाही. मी मग अण्णांना म्हटलं लवकर बरे व्हायचं आहे म्हणून पाणी आणि जेवण देता येत नाही. असे सांगणे मी कम नशिबी असण आणि माझं जगातलं सर्वात मोठ दुर्दैव होत…
मी अनेकदा त्यांना धीर द्यायचो बोलायचो आपल्याला लवकर घरी सुखरूप जायचं आहे. आई, उषा, ओम, अभय, रिद्धी, भैरवी आणि आप्पा घरी वाट पाहत आहेत. काय दुःखत आहे? बर वाटते का? शस्त्रक्रिया चांगली झाली आहे. ते जास्त दिवस ICU मध्ये होते त्यामुळे मी म्हणायचो काळजी करू नका मी इथेच आहे…बाहेर थांबतो….. रात्र रात्र रडायचो…देवाचा धावा करायचो…. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल……..सकाळी उठायचो अण्णांकडे जायचं आणि पहायचं…रात्रीत भगवंत काहीतरी करेल आणि मग अण्णा ठीक होईल. बापाची/ अण्णांची लय आस होती.
दवाखाना नको म्हणायचे.....
माझं कार्य संपले आहे म्हणायचे.....
आता कशाची आस नाही म्हणायचे......
मला घरीच मरायचं आहे असे म्हणायचे.....
दवाखान्याची भीती वाटत असे…सांगत नसे पण जाणवत असे…..
म्हातारी आज्जी घरी आली नाही दवाखान्यात मेली...
म्हणून डॉक्टर आणि दवाखाना नको म्हणायचे…घाबरत नव्हते पण काळजी म्हणून..
वडील माझे अण्णा लई कडक आणि रागीट स्वभावाचे होते….पण तितकेच प्रेमळ होते.
बाप म्हणून आमच्यावर लय जरब असायची…आदरयुक्त भीती असायची आणि तितकाच जीव पण लावायचे तसेच लई प्रेम करत असे…बापाने कधीच उपाशी झोपू दिले नाही….
जुन्या आठवणी लहान असताना अगदी खांद्यावर पण घेतलं होते ते सर्व आठवत आहे....
लहान असताना हनुमान जयंतीला मला बोटाला धरून घेऊन जायचे आणि नारळ फोडायला सांगायचे…मग दुसऱ्या दिवशी बैलगाडा पहायला पण घेऊन जायचे…
मला मुंबई पण फिरून दाखवली होती…जुहूचा समुद्र किनारा दाखवला होता…असंख्य आठवणी हृदयात उरल्या आहेत…
मुंबई फिरवून दाखवली पुणे आणि मुंबई भाजी मार्केट दाखवलं....
जगाचा व्यवहार शिकवला...
माणूस म्हणून जगायला शिकवले...
चोरी, लबाडी करू नये...
कोणाला फसवू नये...
फुकटच खाऊ नये हे शिकवलं…
अन्याय सहन करू नको हा धडा दिला…
अण्णांनी नातेवाईकांना आर्थिक मदत म्हणून जुन्या काळात खूप मदत केली आहे.....आणि ते मदत परत करावी अशी नव्हती....आजही जुन्या डायरीत नोंद आहेत. आणि एकाला तर मोठा साहेब केले ती मदत खूप मोठी होती आजची ती किंमत कोट्यवधी रुपयांची होईल...त्यातील काही नातेवाईक अण्णा असताना आले नाही आणि आता त्यांच्यानंतर घरी येऊन गेले...अरे नसते आले तरी चालले असते...तुमच्या मनी काय वसले होते हे आम्ही जाणतो....
अनेक नातेवाईक ते लहान मुले असताना आमच्या कुटुंबात राहायला होते आणि शाळा शिकायला होते...आपुलकी आणि प्रेम हा अण्णा आणि आईचा स्थाई स्वभाव होता...
देव, देश आणि धर्म शिकवला...
पंढरीचा विठोबा, भगवान शंकर ते अयोध्येत असणार श्री. राम शिकवला…
बाप नाही हे वास्तव आहे पण मी आतून कोलमडून गेलो आहे…त्यांच्याशिवाय आता जगावे लागेल…
बाप नाही मनाला पटत नाही….मन सुन्न झाले आहे कामाला जाणे घरी जाणे हे आता कराव लागेल आणि करत आहे.. वर वर बोलतो आणि थोडं मित्रांच्यात मिसळत आहे.. पण मन आतून पोखरले आहे…वेदना आणि दुःख व्यक्त करता येत नाही…. माणसात रडता येत नाही. एकटाच बसलो तर नजर शून्यात जाते आणि डोळे भरून येतात.. आपसकुच रडू येत…
खरंच लई अवघड आहे…
बापाविना जगणं
नियतीने भगवंताने माझ्यावर अन्याय केला...
माझा बाप अवेळी घेऊन गेले....
बापाचं छत्र आता राहिले नाही…
आई, बायको आणि मुले आहेत….
बाकी तुमच्यासारखे मित्र जवळ आहेत ती एक आस आहे..
तुम्ही तुमच्या आईवडिलांची नक्कीच काळजी घ्या...
ते आहे तोवर गठ्ठ मिठी मारूनच घ्या....
तीर्थरूप अण्णा.

0 Comments
POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH