हक्काचा रोजगार, काम आणि व्यवसाय मागणे म्हणजे गुंडगिरी नव्हे तो आमचा हक्कच आहे" - श्री. अर्जुन लहानबा सैद मा.अध्यक्ष - अ. भा. ग्रा. पं. शिरूर तालुका
"होय, ही गोष्ट फक्त सणसवाडीची नाही तर अख्ख्या शिरूर तालुक्याची आहे."
● सणसवाडी सन १९५० ते १९८० -
सणसवाडी परिसरामध्ये साधारण १९५० च्या अगोदर पासून शेती हा मुख्य व्यवसाय होता. गावात दोन चार भागांमध्ये बागायती परिसर होता. शिरूर तालुका जसा दुष्काळी तालुका होता, त्याचप्रमाणे गावात दुष्काळ पाचवीला पुजलेला असायचा. गावातील अनेक लोक इतर गावात मजुरीसाठी जात होते. तर त्यातील काही मांजरी बुद्रुक आणि मांजरी खुर्द ह्या गावात मजुरीसाठी तिकडेच राहत होते. तर गावातील होतकरू आणि जुजबी हुशार असणारे काही तरुण आणि मध्यम लोक, शेतकरी हे मुंबईत आंबे, चिंच आणि इतर फळे आणि फुल - हार विक्री करत असे. ते पण सर्वजण सिजन नुसार मुंबईला जात होते. आणि इतर वेळी गावात शेती करत असत. गावात शेती शिवाय इतर दुसरा व्यवसाय नव्हता. शाळा म्हणाल तर एकल शिक्षक म्हणून १९४० ला ती चालू झाली होती. त्यात फक्त एकच शिक्षक आणि पहिली, दुसरी, तिसरी आणि मग चौथी असे वर्ग सुरू झाले होते. पण त्यावेळी शिक्षण कोणी घेत नव्हते. त्यामुळे शाळा ही जेमतेम हजेरीवर सुरु असायची. तेव्हा गुरुजी म्हणून मोकाशी गुरुजी असायचे सफेद पायजमा आणि निळा शर्टचा छडीसह नेहमीचा पेहराव असायचा. आणि ते शाळेजवळ साठे बंधूंच्या घरात राहत असत. पण मी खात्रीने सांगू शकतो तेव्हा त्यांच्याकडून घरभाडे घेत नसत.
सणसवाडी गावामध्ये डोंगर रांगात तीन चार छोटे तलाव आहेत. दोन्ही बाजूने दोन ओढे वाहत गावात येत आहेत. गावाच्या वर सराटी वस्तीजवळ ते एकत्र येतात. डोंगरातुन आलेल्या ओढ्यावर एक पाझर तलाव आहे. त्या तलावावरील ओढा जानेवारी महिन्यापर्यंत वाहत असतो. पावसाळ्यात ओढ्याला दरवर्षी पुर येत असत पण गेली १५ वर्षे झालेत पूर्वी सारखा पाऊस पडत नाही आणि पुर पण येत नाही. पुढे गावाजवळ दुसरा तलाव आहे. ज्वारी आणि बाजरीसह कांदा हे मुख्य पीक असायचे. इतर कोरडवाहू भागांमध्ये ज्वारी अर्थात कडबा हे पीक घेतले जायचे.
सणसवाडी मधील गावाच्या खालचा भाग बऱ्यापैकी बागायत होता. त्यासोबत देशी गाई, म्हशी, शेळ्या आणि शेतजमीन कसायला बैल आणि बैलगाडीसह शेती औजारे असायची. पूर्वी बारा बलुतेदार पध्दत चालत असे. बागायत भागात पालेभाज्या, ऊस, कांदा आणि काही फळबागा असायच्या आणि त्या भागाला जांभळीचा मळा, चावराचा मळा, बुडखीचा मळा, दंडाचा मळा, पेरूचा बाग ,बामनाची विहिर, नायमळा असे थोडेसे भाग बागायती असायचे. पण ह्या भागात पहिले बैल आणि मोटेवर पाणी शेतीला देत असत. एकंदरीत गाव सुजलाम सुफलाम होते, आणि हो खान्या पिण्याची तादाद नव्हती. प्रत्येक घरी दुप्ती जनावरे होती. गावातील अनेक गुराखी गावातील गुरे राखायला म्हणजे राखुळी घेत असत. गावकुस गावपण जपून होतं. गावात न्याय करण्यासाठी चावडी पण होती. ती चावडी सागवानी लाकडात आणि दगडी बांधकामात बांधलेली होती. एक प्रकारे ते गाव च वैभवच होते. आता चावडीला पाडून शाळेची इमारत बांधली गेली आहे. गावात पूर्वी दगडी बांधकाम असलेले भव्य दिव्य वाडे होते. ते वाडे एकत्र कुटुंब पद्धतीची साक्ष देत होते. वाडा म्हणजे रुबाब, वाडा म्हणजे मान - सन्मान, वाडा म्हणजे ताकद, वाडा म्हणजे पूर्वजांंचा ठेवा, वाडा म्हणजे एक आठवण, वाडा म्हणजे संस्कृती पण आज ते अस्तित्वात नाही हे दुर्दैव आहे. शिल्लक आहेत ते फक्त दगडी अवशेष बस.
याच वाड्यातील अनेक तरुण कुस्ती क्षेत्रात आणि कबड्डीत नाव कमवत होते. जसे जुने पैलवान श्री. सुदाम तात्या दरेकर, चंदर तात्या दरेकर आणि नव्या पिढीतील राज्य पातळीवर नावाजलेले पैलवान देवराम दरेकर आणि कै. संपत हरगुडे असे पैलवान होते. गावात जुनी पण टुमदार कौलारू दगड मातीत बांधकाम केलेली तालीम आणि भव्य दिव्य वाडे आणि घरे होती. आणि त्यातीलच जुने जाणते लोक अंगापिंडाने मजबूत दुहेरी हाडाचे होते. त्यांच्या देखरेखीखाली गावातील तालीम चालत असे. गावात ग्रामदैवत श्री. भैरवनाथ देवाची यात्रा, बैलगाडा शर्यत, छबिना, कुस्ती आखाडा, आणि तमाशा पण होत असे.
कुस्ती आखाडा
याच बरोबरच गावात आपले हिंदू धर्मातील सर्व सण साजरे होत असत आणि आता पण साजरे केले जातात. गावात एक गाव एक शिवजयंती उत्सव साजरा केला जातो यामध्ये संपूर्ण गाव सहभागी होत असते.
गावात पूर्वीपासूनच एक भजनी मंडळ आहे. ते दर गुरुवारी आणि प्रत्येक सण आला की श्री. विठ्ठल मंदिरात भजन करत असतात. गावातील गाव कारभारी हे सर्व मंदिर आणि शाळा यांच्या इमारती यात्रा वर्गणीतुन शिल्लक राहिलेल्या पैस्यातून त्यांचा जिर्णोद्धार करत असे. गावात एकोपा होता किरकोळ वाद वगळता गावात कधी दुफळी नव्हती. सुख दुःखात सर्व गावकरी एकत्र येत असे. शेतीत बैलजोडीसह शेती काम करण्यास एकमेकांशी सावड असे. म्हणजे दोघांचे बैल एकत्र करून नांगरणी करणे, पेरणी करणे आणि इतर शेती काम करणे त्याला सावड्या असे म्हणत.
पण याच कालावधीत गावात १९७४ ला तळेगाव ढमढेरे ग्रुप ग्रामपंचायत मधून सणसवाडी ही नवीन ग्रामपंचायत स्थापन झाली. त्यानंतर १९७८ ला गावात पहिली निवडणूक झाली. आणि गावात दोन गट पडले. पण गावाच्या विकासात सर्वांचे मत एक होत असे.पण गावात दोन गटात खूप वाद होऊन तुंबळ मारामारी पण झाली होती. पण भांडण तंटे करून आणि कोर्ट कचेरी करून कोणाचं भल होत नाही. त्यामुळे नंतर असे वाद निर्माण झाले नाही.
श्री. विठ्ठल मंदिर, श्री. हनुमान मंदिर, श्री. भैरवनाथ मंदिर, श्री. खंडोबा मंदिर, माता श्री.महालक्ष्मी मंदिर, श्री. काळुबाई मंदिर, श्री. देवीआई मंदिर, श्री. नरेश्वर मंदिर आणि गेल्याच वर्षी हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करून भव्य असे श्री. राम, श्री. लक्ष्मण सीता आणि श्री. हनुमान मंदिर बांधले आहे. अशी ही मुख्य मंदिरे आणि बैलगाडा घाट, जिल्हा परिषद शाळा इमारत, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय इमारत, विस्तीर्ण सह्याद्री डोंगर रांग, पाझर तलाव, दंडाचा तलाव, विमान तळ तलाव, डोंगरातील खिंड रस्ता, श्री. नरेश्वर मंदिर परिसरातील वनराई, जुनी ग्रामपंचायत इमारत, गावठाणातील गावाच्या बाहेर ओढ्या जवळ असलेली जुनी दगडात बांधकाम केलेली बारव आणि अहमदनगर महामार्गाच्या पुलाजवळ असलेली पाण्याची जुनी दगडी बांधकाम असलेली बारव आणि ह्या गोष्टी गावच्या वैभवात भर घालत आहेत. दोन्ही बारवत पाणी काढण्यासाठी बारवच्या मध्यापर्यंत दगडी पायऱ्या आहेत.
इकडे पहिली पिढी म्हणजे आजोबा आणि आज्जी यांची पिढी चांगले जीवन जगत होती आणि त्यातील वयोमानाने काही संपले तर काही जिवंत आहेत. यांच्या सारखे निरोगी, सुंदर दिर्घ आयुष्य लाभणे आता नशिबात नाही.
● सणसवाडी सन १९८० - १९९५ -
सणसवाडी गावात १९८५ -८६ दरम्यान नुकतीच चार खांब टाकून गावात वीज आली होती. तोपर्यंत गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये इयत्ता ७ वी पर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध झाली होती. पुढे शिकणारी मुले ही सातवी पर्यंत जात होती. तर काही अगोदरच शाळा सोडत होती. चार दोन मुले पुढे तळेगाव ढमढेरे हायस्कूलला गेली आणि त्यातील मोजून २, ३ उच्चशिक्षित झाली. हीच ती काय जमेची बाजू होती. त्यामुळे इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पुरेसे होते. अनेकांचा कल हा शेती करणे हाच होता. तसेही कितीही प्रगती झाली तरी शेती शिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे १९८७ पर्यंत शिक्षणाचा अनेकांना गंध नव्हता. हेच ओळखुन चार बुक उच्चशिक्षित झालेल्या आणि चांगल्या हुद्यावर असणाऱ्या शिक्षक तरुणांनी गावात श्री. नरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. आणि गावात १९९० नंतर हायस्कूल सुरू झाले. आता भव्य इमारतीमध्ये हायस्कूलसह उच्च शिक्षण उपलब्ध झाले आहे. त्यामागे अनेक लोक कार्यरत होते. वैयक्तिक देणगीदार आणि गाव यात्रा वर्गणीतून संस्था उभी राहिली आहे. आणि गावची शाळा नावारूपाला आणली ती संस्थेच्या पदाधिकारी आणि शिक्षक, विद्यार्थी यांनी.
ह्या पिढीतील वडीलधारी मंडळी आतुर इंडिया आणि इतर कंपनीत अकुशल आणि कुशल कामगार म्हणून कामाला होते. आता ते रिटायर झालेत. त्यांना सहज काम मिळाले होते, ही त्यांची खरी जमेची बाजू होती. काही अपवाद वगळता, पण दुर्भाग्य हे की त्यांची पुढील पिढी ना नोकरी मिळवू शकले ना व्यवसाय !!! त्यातील आणि इतरांची मुले शेती करत आहे. एखादा दुसरा नोकरी करत असेल पण म्हणावी तशी प्रगती दिसत नाही. पण शेवटी प्रगती कशात आणि किती मानायची हे ज्याच्या त्याच्या विचारसरणी अवलंबून आहे.
"आता आपण पाहणार आहोत मा. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी दुष्काळी शिरूर तालुकाला एकाच वेळी दोन देणग्या दिल्या होत्या त्याचा परिणाम गावावर कसा झाला. अर्थात तो तसा संपूर्ण शिरूर तालुक्यावरच झाला आहे."
● १) चासकमान प्रकल्प -
दरम्यानच्या काळात गावात विद्युत पुरवठा सुरू झाला आणि त्यामुळे पाणी पंपामुळे बागायत क्षेत्र वाढत गेले होते. अनेकांनी शेतीत जम बसविला होता. गाव आणि शेतकरी यांच्या हातात शेतीतून चार पैसे येत होते. तर शेतकरी आर्थिक बाबतीत सधन होत होते. तर एकीकडे कुटुंब पण विस्तारत गेली. १९८० च्या आगोदर दुष्काळी तालुका म्हणून शिरूर तालुक्यातील गावांना चासकमान प्रकल्प सुरू झाला. आणि एकत्रित कुटुंब संस्था म्हणून एकोम्या म्हणून ज्येष्ठ व्यक्तीच्या नावे सर्व शेतजमीन असे. चासकमान प्रकल्पामुळे खाते फोडीला बंदी आली होती. स्थानिक म्हणून हा एक मोठा घाव शेतकरी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला बसला होता. अनेक एकत्र कुटुंबातील जमिनीचे चासकमान प्रकल्पातील शेतकरी यांना जमीन देण्यासाठी भूसंपादन झाले. आणि यासह उरलेल्या जमिनीत पाटासाठी असे दुहेरी भूसंपादन झालं. त्यामुळे शेतकरी दुहेरी कचाट्यात सापडला होता. कोर्ट कचेरी केल्या, पण जे गेले ते गेले आणि उरले सुरले पण गेले. पुढे कळले की सर्व भूसंपादन चुकीचे होते. आणि पुढे सन २००५ नंतर तर प्लाटिंग माफिया, दादा,भाई आणि भूसंपादन अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या जिल्हाधिकारी यांच्या नावावर होत्या. त्या बेकायदेशीररीत्या बळकावल्या आणि गुंठेवारी करून करोडो कमावले. असे शेतकरी उध्वस्त होत गेले ते फ़क्त सणसवाडी नाही तर संपूर्ण शिरूर तालुक्यातील उध्वस्त झाले आहे. शेती विकणारे विकत गेले आणि खरेदी करणारे खरेदी करत गेले ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
अशा वेळी गावातील अशिक्षित पण हुशार आणि शिकलेल्या काही लोकांनी पुण्यातील राजकीय इस्टेट एजंट सोबत एजंटगीरी चालू केली होती. त्यामुळे ह्या लोकांनी गरीब आणि आर्थिक कमकुवत, अशिक्षित आणि व्यसनी असणाऱ्या लोकांना हेरून टार्गेट करणे सुरू केले. ह्या जमिनीत काय पिकतय फ़क्त कुसळ. तशीही ही जमीन कोरडवाहू आहे. पाण्याची सोय उपलब्ध होत नाही. त्यामुळे तुम्हाला काही फायदा होणार नाही. ही जमीन नुसती दगड, मुरमाड आहे. अरे लका माझं ऐक जमीन विकून टाक चांगलं पैसे होत आहे. मी म्हणून तुला सांगतो दुसरं कोणी असते तर बोललो नसतो. तुझ्या फायद्याचे गणित आहे, म्हणून मी लक्ष दिले आहे. मरमर राबण्यापेक्षा पैसे होत आहे करून घे. अशा एजंट लोकांनी आणि मध्यस्थी म्हणून असणाऱ्या राजकीय एजंट लोकांनी, मारवाड्यांनी अनेकांच्या घरी पिंगा घातला होता. अशिक्षित आणि भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांचा यांनी फायदा घेतला होता.
मग काय अनेकांनी कवडीमोल भावाने जमिनी विकल्या आणि आज ते सर्व कंगाल झाले आहेत. कारण ते आर्थिक साक्षर नव्हते, आलेला पैसा कसा खर्च करावा किंवा तो कसा आणि कोठे गुंतवणूक करावा. याबद्दल माहिती आणि ज्ञान त्यांना नव्हते. त्यांनी आपल्या मुलांचा आणि पुढील पिढीचा विचार केला नाही. यामध्ये चासकमानला क्षेत्र गेले तर उर्वरित काळ्या आईची कवडीमोल भावाने विक्री केली गेली होती. आज चारदोन गुंठे शिल्लक आहेत. तर ते शेतकरी आणि त्यांची मुले कुठेतरी मजुरी करत आहेत. पण यामध्ये असे अनेक शेतकरी आहेत ज्यांनी जमीन विकली ( विक्री ) नाही. ते तग धरून राहिले त्यांना मानाचा मुजरा. कारण आज ते वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय त्याच जमिनीवर करत आहे.
● सणसवाडीतील बेरोजगार युवक १९९५ - २००० -
गावात आणि शेजारच्या गावात उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध झाली होती. त्यामुळे गावातील तरुण उच्च शिक्षण घेत होते. तर अनेकांनी ITI, इंजिनिअरिंग पूर्ण केले होते. त्यामुळे अगोदर गावात काही कारखाने चालू होते. तिकडे रोजगार मिळावे म्हणून तरुण झटत होते. पण अनेकांच्या पदरी निराशाच आली. स्थानिक म्हणून काही कंपन्या कामाला घेत नसत. काही ठिकाणी बोलवून सरळ सरळ नाकारले जात होते. म्हणजे एक प्रकारे हाकलून च दिले जायचे. हो त्यावेळी काही मुले कामाला लागली होती. त्यातील अनेकांचे चांगले बस्तान बसले आहे. पण इतरांना येनकेन प्रकारे त्रास देणं, दुय्यय दर्जाची कामे देणे, घालून पाडून बोलणे, विनाकारण कामावरून काढणे, असल्या कसरती सुरू झाल्या. काही कंपनी प्रशासन आणि त्यातील लोकं चांगली होती. त्यामुळे अनेकांचे कल्याण निश्चितच झाले. तर काही कामगारांना अचानक मध्येच सूचना न देता कामावरून काढले जात आहे. जिथे अवहेलना झाली तिथे स्थानिक म्हणून अनेकांनी नक्कीच जाळ काढले. पण तोपर्यंत स्थानिक कामगार नको ही औद्योगिक क्षेत्रात मानसिकता तयार झाली होती.
कारण स्थानिक अन्याय सहन करत नसे. आणि अयोग्य मोबदला घेत नसे. याच गोष्टींचे भांडवल करून स्थानिक कामगारांना बदनाम करण्यात आले. आणि यातूनच ठेकेदारी फोफावली आणि परराज्यातील कामगार आयात होऊ लागले. आणि यातूनच स्थानिकांचे रोजगार कायमचे बुडाले. त्यामुळे स्थानिक अधिकच बेरोजगार झाले. आज मजूर म्हणून आणि उच्च हुद्यावर परराज्यातील कामगारांचे प्राबल्य आहे.
● सणसवाडीतील लघु उद्योजक आणि ठेकेदार -
सन १९८८ पासून २००५ पर्यंत मराठी तरुण नोकरीच्या मागे जात होता. आणि सणसवाडीसह शिरूर तालुक्यात नव्याने MIDC उभी राहत होती. मुलांनी शिकाव आणि चांगली नोकरी करावी हेच शिकवले जायचे. त्यामुळे तालुक्यासह गावातील कंपन्यांतील कुशल अकुशल कामगार पुरवठा, लघुउद्योग आणि कामाचे ठेके, भंगार मालाचा ठेका आणि इतर कच्च्या मालाचा पुरवठा करण्याचे काम हि तालुक्याबाहेरील अर्थात जिल्ह्याबाहेरील आणि राज्याबाहेरील लोकांनी अगोदरच काबीज केले होते. त्यामुळे सणसवाडी येथील इंडस्ट्रीज एरियामध्ये स्थानिकांना व्यवसाय मिळणे मुश्किल झाले होते. १९९८ नंतर सोशल मीडिया क्रांती झाली. जग डिजिटल मार्फत जवळ आलं त्यामुळे स्थानिकांना त्यांच्या प्रश्नांबाबत आणि अडचणीबाबत शिक्षणामुळे जागृती होऊन माहिती होऊ लागली होती.
कंपनीमध्ये कामाला रुजू होणे बाबत किंवा कंपनीतील कच्चामाल पुरवठा करणे बाबत, त्यामध्ये हाउसकीपिंग साहित्य असेल, स्टेशनरी साहित्य असेल, सेवा पुरवणे, त्याच प्रमाणे इतर कच्चामाल असेल याबाबतीत कसे नक्की काम चालते. याची पूर्ण माहिती स्थानिकांना होऊ लागली होती. स्थानिक म्हणून अनेकजण वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रात शिरकाव करत होते. आणि या ठेकेदार आणि सप्लाय चेन बाबतीत असणारे आर्थिक लाभ आणि गणितं ही स्थानिक तरुणांच्या लक्षात आली होती. तिथून पुढे स्थानिकांनी सुद्धा लहान मोठे व्यवसाय सुरू करुन आणि सप्लायर वेंडर म्हणून आणि इतर सेवा देऊन काम करण्यास सुरुवात केली. अनेकांना यामध्ये सुद्धा अपयश आले तर काहींनी यात जम बसवला. हो यातील जमेची बाजू म्हणजे अनेक लहान मोठे उत्पादन सेवा प्रकल्प राबवून लाखो आणि करोडोंची उलाढाल असणारे उद्योग सुरु केले आहे. पण हे बोटावर मोजता येतील असे मोजकेच स्थानिक तरुण आहेत. तर इतर अजून धडपडत आहेत.
त्यासाठी त्यांनी गावातील ग्रामपंचायत पदाचा अर्थात सरपंच, उपसरपंच ह्या पदाचा उपयोग करून घेतला. तर काहींनी स्वतः च्या हिमतीवर कामे घेतली. यामध्ये स्पर्धा वाढू लागली होती. परंतु सणसवाडी असू द्या किंवा शिरूर तालुका असुद्या स्थानिकांना प्राधान्य हे नेहमीच कमी असायचे आणि आहे. संपूर्ण शिरूर तालुका आणि सणसवाडीचा जरी विचार केला, तरी सणसवाडीमध्ये जवळजवळ 90% पेक्षा जास्त बाहेरील लेबर कॉन्ट्रॅक्टर आणि सप्लायर्स कार्यरत आहेत. सणसवाडी आणि परिसरात असलेली परिस्थिती आणि गांभीर्य हे रांजणगाव गणपती MIDC चालू होताना तेथील तरुणांनी ओळखून सावध होऊन संघर्ष करून कामे बाहेर जाऊ दिली नाही. पण असे इतर ठिकाणी घडले नाही.
● सन २००५ नंतरची सद्य परिस्थिती -
शिरूर तालुका काय? तर सणसवाडी मधील स्थानिकांची कॅपाबिलिटी असून सुद्धा त्यांना संधी मिळणे अवघड झाले. अशातच अनेक ठिकाणी कंपनी प्रशासन आणि स्थानिकांमध्ये संघर्ष होऊ लागला ह्या संघर्षाची धार इतकी तीव्र होती की अनेक वेळा कंपनी प्रशासनातील अधिकारी यांच्यावरती हल्ले होऊ लागले होते. तर स्थानिक म्हणून अनेकांवर गुन्हे दाखल झाले होते.
ही परिस्थिती निर्माण झाली कारण -
स्थानिकांना डावलने हेच होते.
कामे तर जिल्ह्याबाहेरील लोकांना दिली जातात.
हे कमी की काय म्हणून युपी, बिहारींना पण कामे दिली गेली आहेत….
कंपनी प्रशासन, HR HEAD यांची हीच रणनीती राहिली आहे.
जमीन आपल्या गावची…….
पाणी आपल्या गावचे…...
रस्ते आपल्या गावचे…….
प्राथमिक सुविधा गावातून…...
परवानगी आपल्या ग्रामपंचायतची घ्यायची…...
महाराष्ट्र शासनाकडून घ्यायच्या .......
कंपणीत काही अडचण ……
प्रश्न असेल तर स्थानिकांच्या मार्फत सोडवायचे…...
आणि हवा, पाणी, ध्वनी आणि जमीन प्रदूषण आपल्या गावाचे करायचे.....
फायदे मात्र युपी,बिहरींना द्यायचे....
जिल्ह्याबाहेरील लोकांना द्यायचे.
बरोबरच विभाग मॅनेजर आणि HR HEAD सुद्धा आपला हिस्सा राखून ठेवतात.
वर म्हणतात आम्ही त्यातले नाही....
मला काही कमी नाही, माझ्या घरी करोडोंची संपत्ती आहे. नुसती फेकाफेकी…..
विकास नक्की कोणाचा झालाय आणि केलाय ???
चासकमानला जमिनी आमच्या गेल्या
भूसंपादनाला जमिनी आमच्या गेल्या…
चासकमान पाटाला जमिनी आमच्या गेल्या….
पाणी शेतीला कमी आणि कंपणीला जास्त दिले जाते.....
वस्तुस्थिती शेतकऱ्यांना पाणी दिले जात नाही....
दुष्काळी भाग म्हणून 'श्री. शरद पवार साहेबांनी' कंपन्या आणल्या...
पण तरुण, युवकांना व्यवसाय व रोजगाराच्या संधीच दिल्याच नाही.
"मग हक्काच्या कामासाठी आणि व्यवसायासाठी संघर्ष केला तर
गुंडगिरी कसे म्हणता ???
नवीन पोलिस अधीक्षक आले की पत्रकार परिषदेत सांगतात की मी MIDC मधील गुंडगिरी मोडून काढणार !!!
पण हे मोडून प्रश्न संपेल का?
साहेब ही गुंडगिरी नाही आहे. आम्ही गुंड कधीच नव्हतो आणि नाही. पण एक दोन छोट्या मोठ्या चुका आणि अपराध निश्चितच झाले असतील. ते घडण्या मागची पार्श्वभूमी तर पहा. आम्ही शेतकऱ्यांची पोर आहोत. हा आमच्या जगण्याचा, जीवन मरणाचा प्रश्न आहे. साहेब तुम्ही कधीतरी ह्या गोष्टीच्या मुळाशी जा.
म्हणजे आमच्या जिल्ह्यात, तालुक्यात, गावात, भागात, आमच्या जमिनीवर उभ्या असलेल्या कारखान्यात बाहेरचे येऊन पैसे कमवतील आणि आम्ही काय टाळ कुटायचे की वाचमेन गिरी करायची?
हे काय खरं नाही."
अस किती दिवस चालायचे ???
हि वेळ का आली?
याचे कारण काय?
या परिस्थितीला जबाबदार कोण आहे?
हेच कोण पाहत नाही.
आणि आमची बाजू मांडायला कोणीच तयार नाही.
अनेक निवडणूका आल्या नि गेल्या...
पण प्रश्न तोच आहे आणि तसाच आहे......
हा प्रश्न फक्त सणसवाडीचा नाही संपूर्ण शिरूर तालुक्याचा आहे. त्यामुळे 'सणसवाडी, कोरेगाव भिमा, डिंग्रजवाडी, शिक्रापूर, वढु बु।। कोंढापुरी, रांजणगाव गणपती, कारेगाव,
इत्यादी गावातील जमीन विकून अनेकजण चहाची गाडी व सेक्युरिटी म्हणून (सर्व जण नाही) काम पाहत आहे.
तर काही शेतकऱ्यांची मुले बेरोजगार म्हणून टुकार हिंडत आहे. काहींनी सर्व जमिनी विकून फुकुन टाकल्या. तर काहींनी गुंठेवारी करून ५, १० लाखावर मजा मारत आहेत.
हि स्थानिकांची अवस्था !!!
म्हणून संघर्ष करावा लागतोय....
कारण स्थानिक तरुण संघटित नाही.......
आणि संघटन करायला कोणीही धजत नाही...
हि बाब अनाकलनीय आहे.
होय मी स्थानिक भूमिपुत्र आहे, माझ्या हक्कासाठी मी लढायला आणि संघर्ष करायला तयार आहे. मग मला गुंड म्हणू द्या नाहीतर दहशतवादी...आता ह्या परिस्थितीचा विस्फोट व्हायची वेळ आली आहे.
होय,
"रोजगार आणि व्यवसाय हा स्थानिकांना मिळालाच पाहिजे. कारण तो आमचा हक्कच आहे, लक्षात असुद्या ही गुंडगिरी नाही."
स्थानिकांना विरोध करणाऱ्या पर्यंत हि पोस्ट पोहोचायला हवी इतकी शेअर करा...आणि आपला आवाज बुलंद करा !!!
लेखन - मा.श्री. अर्जुन लहानबा सैद
सणसवाडी, शिरूर,पुणे.













0 Comments
POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH