Mutual Fund Redemption : म्युच्युअल फंडातून पैसे कसे काढायचे? 'असे' आहेत मार्ग
Mutual Fund Redemption : म्युच्युअल फंडातून पैसे कसे काढायचे? 'असे' आहेत मार्ग
मुंबई : Mutual Fund investment : बहुतेक म्युच्युअल फंडातून (Mutual Fund) कोणत्याही वेळी आपण आपली गुंतवणूक काढून घेऊ शकतो. म्युच्युअल फंडातून पैसे काढणे या प्रक्रियेला रिडेम्प्शन (Redemption) म्हणतात.तुम्ही म्युच्युअल फंड योजनेतून पैसे काढता तेव्हा तुम्ही तुमच्या मालकीच्या युनिट्सची विक्री करता. यावेळी त्या फंडाच्या एनएव्हीप्रमाणे (NAV) आपल्याला पैसे मिळतात.
मात्र, असे काही फंड आहेत ज्यांचा लॉक-इन कालावधी असतो. या फंडांचा लाॅक- इन कालावधी संपल्यानंतरच आपल्याला पैसे काढता येतात.इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELLS) फंडांचा मॅच्युरिटी लॉक-इन कालावधी 3 वर्षांचा आहे. हा कालावधी संपल्यानंतर गुंतवणूकदार अंशतः किंवा पूर्ण रक्कम काढून शकतो किंवा दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक तशीच ठेवू शकतो. म्युच्युअल फंड योजनेतून पैसे कसे काढायचे ते समजून घेऊ.
म्युच्युअल फंडांतून पैसे काढण्यासाठी, तुम्हाला तुमच्या ब्रोकरच्या प्लॅटफॉर्मवर, AMC च्या वेबसाइट/ॲपवर लॉग इन करावे लागेल किंवा तुमच्या एजंट/वितरकाशी संपर्क साधावा लागेल. त्यानंतर तुम्हाला किती रक्कम काढायची आहे हे सांगावे लागेल. पैसे काढण्याची प्रक्रिया रिडेम्पशन म्हणून ओळखली जाते, आणि हे पैसे तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत बँक खात्यात जमा होतात.
पैसे काढण्याचे मार्ग:
ऑनलाइन प्लॅटफॉर्म : तुम्ही Grow किंवा Bajaj Finserv सारख्या ब्रोकरेज प्लॅटफॉर्मवर लॉग इन करून रिडेम्पशनची विनंती सबमिट करू शकता.
AMC वेबसाइट/ॲप : तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंड AMC च्या वेबसाइट किंवा मोबाईल ॲपद्वारे थेट पैसे काढू शकता.
वितरक किंवा एजंट : तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंडाच्या वितरक किंवा एजंटशी संपर्क साधून, त्यांना स्वाक्षरी केलेला रिडेम्पशन फॉर्म सबमिट करू शकता. ते तुमच्या वतीने एएमसीकडे विनंती सादर करतील.
रिडेम्पशनचे दोन प्रकार
1) आंशिक पैसे काढणे
या प्रकारात तुम्ही म्युच्युअल फंडातून अंशतः पैसे काढता. याचा अर्थ असा की तुम्ही गुंतवणुकीचा काही भाग रिडीम करता. बाकीची गुंतवणूक शिल्लक राहते. उदाहरणार्थ, तुम्ही म्युच्युअल फंड योजनेचे 10,000 युनिट्स खरेदी केले आहेत.प्रत्येक युनिटची किंमत 10 रुपये आहे. म्हणजे तुमची एकूण गुंतवणूक 1 लाख रुपये आहे.तुम्हाला 50,000 रुपये काढायचे असतील तर तुम्हाला 5,000 युनिट्स रिडीम करावे लागतील. तुमच्या गरजेनुसार तुम्ही हवे तेवढे युनिट विकू शकतो.
2) पूर्ण पैसे काढणे
तुम्ही तुमची म्युच्युअल फंड योजनेतून गुंतवणूक पूर्णपणे काढून घेऊ शकता. म्हणजे पूर्ण युनिट विकून तुम्हाला सर्व पैसे काढता येतात.
रिडीम करण्याचे मार्ग
ब्रोकर किंवा वितरकामार्फत
ब्रोकर किंवा वितरकामार्फत म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल तर तुम्ही त्यांच्यामार्फतही पैसे काढू शकता. तुमच्या ब्रोकरशी संपर्क साधा आणि पैसे काढण्याची विनंती करा. तुम्हाला पैसे काढणे ऑफलाइन करायचे असल्यास तुम्हाला फॉर्म भरून सबमिट करावा लागेल. ब्रोकर मालमत्ता व्यवस्थापन कंपनीकडे फॉर्म सबमिट करेल.
ब्रोकरकडे पोर्टल किंवा मोबाइल अॅप्लिकेशनद्वारे ऑनलाइन सेवा असल्यास तुम्ही ऑनलाइन देखील रिडीम करू शकता. तुमच्या म्युच्युअल फंड खात्यात लॉग इन करून पैसे काढण्याचा पर्याय निवडून काढू इच्छित असलेल्या युनिट्सची संख्या टाकून पैसे काढण्याची आॅर्डर नोंदवू शकता.
मालमत्ता व्यवस्थापन कंपनीद्वारे
तुम्ही थेट मालमत्ता व्यवस्थापन कंपनीशी (एएमसी) संपर्क साधू शकता आणि तुमची म्युच्युअल फंड योजना रिडीम करू शकता. तुम्ही AMC च्या शाखा कार्यालयात जाऊन ऑफलाइन पैसे काढण्याची विनंती सबमिट करू शकता. तसेच तुम्ही ही प्रक्रिया ऑनलाइनही करू शकता. AMC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा त्याचे मोबाइल अॅप्लिकेशन डाउनलोड करा आणि रिडेम्पशनची विनंती करा.
डीमॅट आणि ट्रेडिंग खात्याद्वारे
तुम्ही डिमॅट आणि ट्रेडिंग खाते वापरून म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक केली असल्यास तुम्ही या खात्यांद्वारे पैसे काढू शकता. तुमच्या खात्यात लॉग इन करून काढू इच्छित असलेली रक्कम भरा आणि तुमची विनंती सबमिट करा. त्यानंतर दोन ते तीन दिवसात पैसे तुमच्या लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले जातील.
रिडेम्प्शन करताना या गोष्टी लक्षात ठेवा
तुमच्या म्युच्युअल फंड खात्यातून पैसे काढत असताना एक्झिट लोड आणि कर या दोन मुख्य गोष्टींचा विचार करा.
पैसे काढल्यावर एक्झिट लोड
काही म्युच्युअल फंड योजना ठराविक कालावधीच्या आधीच पैसे काढल्यास एक्झिट लोड म्हणजे चार्ज आकारतात. समजा एखादी म्युच्युअल फंड योजना एका वर्षाच्या आत रिडेम्पशनवर २ टक्के एक्झिट लोड आकारते. अशा परिस्थितीत तुम्ही गुंतवणुकीच्या पहिल्या वर्षात पैसे काढले तर तुम्हाला काढलेल्या रकमेवर एक्झिट लोड भरावा लागेल. तुम्ही 1 लाख रुपये काढले तर तुम्हाला 98,000 रुपये मिळतील. आंशिक किंवा पूर्ण पैसे काढले तरी एक्झिट लोड लागू होतो.
किती कर द्यावा लागेल
तुम्हाला जर नफा झाला असेल तर रिडेम्पशनवर कर आकारला जातो. इक्विटी फंडातून एक वर्षाच्या आत गुंतवणूक काढल्यास मिळालेला परतावा हा अल्पकालीन भांडवली नफा असतो. अशा नफ्यावर 15 टक्के कर आकारला जातो. तर 12 महिन्यांनंतर पैसे काढण्यावर दीर्घकालीन भांडवली नफा कर आकारला जातो. एक लाख रुपयांपर्यंतच्या नफ्याला करातून सूट देण्यात आली आहे. 1 लाखापेक्षा जास्त नफ्यावर 12 टक्के कर लागू होतो.
डेट फंडातून 36 महिन्यांच्या आत पैसे काढल्यास अल्पकालीन भांडवली नफा कर आकारला जातो. मिळालेल्या परताव्यावर तुमच्या स्लॅब दरांनुसार कर आकारला जातो. ३६ महिन्यांनंतर पैसे काढल्यास दीर्घकालीन भांडवली नफा कर लागू होतो. या नफ्यावर 20 टक्के कर आकारला जातो.

0 Comments
POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH